जिल्ह्यात कापूस बियाणांचे 13 लाख 75 हजार पाकीटे उपलब्ध
■ शेतकऱ्यांनी विशिष्ट कपाशीच्या वाणांचा आग्रह धरू नये
■ कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
अमरावती -
जिल्ह्यात खरीप हंगामात 6 लाख 86 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. यात सुमारे 2 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड अपेक्षित आहे. यासाठी 12 लाख 47 हजार कापूस बियाणे पाकिटाची आवश्यकता भासणार असून त्यानुसार मागणी नोंदविण्यात आली आहे. यानुसार जिल्ह्यात कापूस बियाणांची सर्व वाणांची 13 लाख 75 हजार पाकीटे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशिष्ट कापूस बियाणे वाणाचा आग्रह धरू नये, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
जिल्ह्यामध्ये कापूस हे महत्त्वाचे खरीप हंगामातील पिक आहे. खरीप हंगाम 2025 मध्ये कापूस पिकाच्या होणाऱ्या लागवडीच्या अनुषंगाने जिल्ह्यात एकूण 12 लाख 47 हजार 500 कापूस बियाणे पाकिटाची आवश्यकता आहे. त्यानुसार सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्व कंपन्यांचे सर्व वाणांचे मिळून एकूण 13 लाख 75 हजार 863 बियाणे पाकीटे उपलब्ध आहेत. जिल्ह्यामध्ये कापूस बियाण्यांच्याबाबत कोणतीही टंचाई नाही. सर्व वाणांची मिळून मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे. दर्यापूर तालुक्यात कापूस पिकाच्या विशिष्ट कंपनीच्या विशिष्ट वाणाच्या बियाण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सदर मागणी असलेले वाण हे बीजी टू या प्रकारातील कापसाचे वाण असून यामध्ये कपाशीवरील किडींना प्रतिरोधक करणारे दोन प्रथिने असतात. मात्र याच प्रकारातील इतर कंपन्यांचे वाण बाजारात उपलब्ध असून त्यामध्ये सुद्धा किडींना प्रतिरोधक करणारे दोन प्रथिने उपलब्ध आहेत.
विविध शिफारसीय वाणांची निवड केल्यास उत्पादनातील स्थिरता टिकवून ठेवण्यास मदत होते. वेगवेगळ्या हवामान आणि जमीन प्रकारांनुसार शिफारसीय वाणांचा निवड केल्यास उत्पादन टिकवून ठेवता येते. एकाच वाणावर भर दिल्यास विशिष्ट कीड व रोगांना संधी मिळते. विविध वाणांचा अवलंब केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते. एकाच वाणामुळे बाजारपेठेत अतिपुरवठा होण्याची शक्यता असते. वाणांचे वैविध्य मूल्य टिकवून ठेवते. तसेच शिफारस केलेले वाण हे संशोधनाआधारे दर्जेदार आणि सुरक्षित असल्याने शेतकऱ्यांनी पर्यायी वाणांचा पेरणीसाठी उपयोग करणे आवश्यक आहे.
कापूस पिकाचे अधिक उत्पादन येण्याकरीता विशिष्ठ वाणापेक्षा कृषि विद्यापिठाने शिफारस केलेले पिक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर करणे अधिक परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मागणी असलेल्या विशिष्ट वाणाव्यतिरिक्त इतर वाणांचे सुद्धा उत्पादन चांगले येत असल्याबाबत शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये. त्याच प्रकारातील सारखे गुणधर्म असणाऱ्या इतर कंपन्यांच्या बियाणांच्या वाणांची लागवड करण्याकरीता वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.