अमोल खोतकरच्या बहिणीला अटक,घरातच सापडल सोनं अन् काडतुसं
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज मधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी 15 मे रोजी मोठा दरोडा पडला होता
छत्रपती संभाजीनगर च्या वाळूज मधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी 15 मे रोजी मोठा दरोडा पडला होता .या दरोड्यात संशयित आरोपी अमोल खोतकर याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला . या दरोड्यात साडेपाच किलो सोनं 32 किलो चांदी आणि 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत . दरम्यान, एन्काऊंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला पोलिसांनी अटक केली आहे .रोहिणीकडेच 22 तोळे सोनं सापडलं असून घराची झडती घेतल्यानंतर सोन्यासोबत सात जिवंत काढत असेही सापडले आहेत .
एन्काऊंटर मध्ये मृत्यु झालेल्या खोतकरच्या बहिणीला अटक
पोलिसांनी सुपारी घेऊन भावाचा एन्काऊंटर केला असा आरोप लड्डा दरोडा प्रकरणात आरोपी अमोल खोतकर याच्या बहिणीने रोहिणी खोतकरने काही दिवसांपूर्वी केला होता. माझा भाऊ मला नेहमी सांगायचा की त्याला मारण्यासाठी सुपारी दिली आहे, जी एका श्रीमंत व्यक्तीने दिली आहे. मी घरी आलो नाही तर समजून जा संपवले आहे, असं तो सतत म्हणायचा असा आक्रोश रोहिणी खोतकरने केला होता. त्यानंतर आता त्याच्या बहिणीलाच अटक करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
जादूटोण्याच्या सहाय्याने आखला होता चोरीचा डाव, पण...
संतोष लड्डा यांच्या घरी करोडो रुपये पोत्यात भरून ठेवेलेले आहेत, अशी टीप त्यांचाच जवळचा मित्र बाळासाहेब इंगोले याने दिली होती. पण, बाळासाहेब इंगोले आणि त्याच्या काही साथीदारांना ही रक्कम जादूटोणा करून पळवायची होती. म्हणजे एक महाराज जादूटोणा करतो आणि घरात असलेले पैसे हात न लावता बाहेर काढतो, अशी त्यांची धारणा होती. त्यांनी तो महाराजही शोधून ठेवला होता. पण, याबाबतची माहिती हासबे नावाच्या आरोपीला मिळाली होती. हासबे याने त्याच्या टीमसह संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा टाकत मुद्देमाल पळवून नेल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरोड्याच्या घटनेतील संशयित आरोपी अमोल खोतकर यांने गोळीबार करून पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात्मक गोळीबारात त्याचा मृत्यू झाला असं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.