अमरावतीत कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी 55,925 शेतकऱ्यांची निवड !
महाडीबीटी पोर्टलवर यादी प्रसिद्ध; पात्र शेतकऱ्यांना 10 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन
अमरावती -
दि. 4 कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर अमरावती जिल्ह्यातील 55,925 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या निवड झालेल्या शेतकरी आणि घटकांची सुमारे 20 कोटी रुपयांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील निवड झालेल्या 55,925 शेतकऱ्यांना कृषी आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत लवकरच लघुसंदेश (SMS) पाठवले जात आहेत. ही यादी महाडीबीटी (DBT) पोर्टल, कृषी विभागाचे संकेतस्थळ तसेच कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या लॉगिनवरही उपलब्ध आहे.
ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे, अशा शेतकऱ्यांनी येत्या 10 दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना तात्काळ पूर्वसंमती मिळेल. पात्र लाभार्थ्यांकडून 10 दिवसांत कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास, त्यांचा अर्ज आपोआप रद्द होईल. प्रोफाईल 100 टक्के पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी AGRISTACK फार्मर आयडीच्या आधारे https://mahadbt.maharashtra.gov.in या साईटवर लॉगिन करावे. ज्यांचे प्रोफाइल 50 टक्के पूर्ण आहे, त्यांनी ते 100 टक्के पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी जातीचा दाखला अपलोड करणे बंधनकारक आहे. अपंग असल्यास (सर्व जातींसाठी) अपंगाचा दाखला अपलोड केल्यास लाभार्थींचे प्रोफाइल 100 टक्के पूर्ण होते. ज्यांच्याकडे AGRISTACK फार्मर आयडी नसेल, त्यांनी तो नजीकच्या CSC (सी. एस. सी.) केंद्राकडून काढून घ्यावा.
या योजनेत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना (शेततळे), प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (सूक्ष्म सिंचन), एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कृषी यांत्रिकीकरण उप - अभियान आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना यांचा समावेश आहे. एकूण 55,925 शेतकऱ्यांसाठी सुमारे 20 कोटी रुपयांचे अनुदान निश्चित करण्यात आले आहे , अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिली आहे .