"कर्तव्यनिष्ठेचा गौरव, सेवानिवृत्तीचा सन्मान"कार्यकारीअभियंता सुधीर अमृतकर यांचा सपत्नीक सत्कार

"कर्तव्यनिष्ठेचा गौरव, सेवानिवृत्तीचा सन्मान"
कार्यकारीअभियंता सुधीर अमृतकर यांचा सपत्नीक सत्कार 
अमरावती/प्रतिनिधी

     आपल्या कर्तव्यनिष्ठ सेवा, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि अथक परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथून कार्यकारी अभियंता पदावरून सेवानिवृत्त झालेले सुधीर अमृतकर यांचा त्यांच्या निवासस्थानी सपत्नीक शाल, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन  सन्मान करण्यात आला.
   अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीला जागतिक औद्योगिक नकाशावर स्थान मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे अमृतकर हे केवळ एक प्रशासकीय अधिकारी नव्हते, तर ते त्या औद्योगिक परिसराचे एक मार्गदर्शक दीपस्तंभ ठरले.
या सन्मान सोहळ्याला सहयोग फाउंडेशनचे सचिव व सामाजिक कार्यकर्ते अमोल चवणे, ज्येष्ठ पत्रकार संजय बनारसे, मंगेश तायडे, रवींद्र ठाकरे आणि इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. 
    सुधीर अमृतकर यांनी आपल्या उत्तर भाषणात अत्यंत नम्रपणे आणि भावनिक स्वरात सर्व मान्यवरांचे आभार मानले. "सेवा हीच साधना मानून मी कार्य केले. हे गौरव क्षण माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात राहतील. मी जे काही करू शकलो, ते माझ्या सहकाऱ्यांच्या आणि कुटुंबाच्या साथीतूनच शक्य झाले," असे ते म्हणाले.एक सुसंस्कृत, मनमिळावू आणि कामाच्या प्रति निष्ठावान अधिकारी म्हणून अमृतकर यांची एमआयडीसी मध्ये वेगळी ओळख होती. त्यांच्या नेतृत्वात नांदगाव पेठ एमआयडीसीने औद्योगिक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली. त्यांनी केवळ प्रकल्प उभारले नाहीत, तर एक विश्वासाचे आणि विकासाचे बळ निर्माण केले.सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करत उपस्थितांनी त्यांना उज्ज्वल, समाधानी आणि निरोगी पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.