शासकीय योजनांच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी करावी

शासकीय योजनांच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी करावी

■ जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन
अभिनव ॲग्रीस्टॅक प्रकल्प शेतकऱ्यांसाठी उपयुक्त

अमरावती, दि. 12 
शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात सुलभता आणण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून या अभिनव योजनेत शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नोंदणीनंतर प्राप्त होणारा शेतकरी ओळख क्रमांक अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक योजनेमध्ये सहभाग अथवा लाभ मिळविण्याकरीता शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम प्राधान्याने नागरी सुविधा केंद्रमध्ये जावून शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.

     अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासात कृषि क्षेत्र महत्त्वाचे आहे. अन्नधान्य उपलब्धता, शेती आणि शेती संलग्न व्यवसाय जोपासणे, तसेच कृषी मालाची साठवणूक सुविधा, योग्य बाजारपेठ, भाव यासोबतच कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे. राज्यातील कृषी क्षेत्राशी 55 टक्के लोकसंख्या निगडीत आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण योजना योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून कृषी क्षेत्राचा अधिक विकास होण्याच्या उद्देशाने राज्यामध्ये ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे.

     ॲग्रीस्टॅक ही कृषी क्षेत्रात डाटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकतेसह पोहोचवण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आहे. राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याकरिता ॲग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

   ॲग्रीस्टॅक अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक देण्याची सुविधा नागरी सुविधा केंद्रामार्फत केली जाणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी नागरी सुविधा केंद्रांमध्ये सातबारा, आठ अ आणि आधार कार्ड ही कागदपत्रे घेऊन भेट द्यावी. तसेच शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नोंदणी करीत असताना आधारशी संलग्न असणाऱ्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त होणार आहे. सदर प्राप्त होणारा शेतकरी ओळख क्रमांक हा अत्यंत महत्त्वाचा असून तो प्रत्येक शेतकऱ्यांनी जपून ठेवावा. शेतकऱ्यांशी संबंधित प्रत्येक योजनेमध्ये सहभागी अथवा लाभ मिळण्याकरिता शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असणार आहे.

त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी प्रथम प्राधान्याने नागरी सुविधा केंद्रामध्ये जाऊन शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा. ॲग्रीस्टॅक नोंदणीमुळे खातेदारास शासनांच्या सुविधेचा लाभ सुलभपणे मिळणार आहे. शासन स्तरावरही खातेदारांसाठी प्राधान्याने नोंदणी करण्याचे सूचना सर्व तलाठी व कृषि सहायक यांना देण्यात आल्या आहे. 

नोंदणीमुळे शेतकऱ्यांना पीएम किसानसह इतर योजनेचा लाभ घेण्यास सुलभता होणार आहे. शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी किंवा कृषि सहायक यांच्याशी संपर्क साधावा आणि शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.