जळगाव शिवारातील दोन डीपी बंद; पिकांचे नुकसान उमेश भुजाडणे यांच्या नेतृत्वात वीज वितरण कार्यालयात शेतकऱ्यांचा धडक मोर्चा
धामणगाव रेल्वे -
जळगाव मंगरूळ येथील ठाकरे डीपी व पाटील डीपी गेल्या एका महिन्यापासून बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून, भाजीपाला आणि संत्रा पिके कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. वारंवार तक्रारी करूनही वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केल्याने आज संतप्त शेतकऱ्यांनी उमेश भुजाडणे यांच्या नेतृत्वात मंगरूळ दस्तगीर येथील वीज वितरण कार्यालयावर धडक दिली.
या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी वीज अभियंता खान यांची भेट घेतली आणि बंद डीपी तत्काळ दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची जोरदार मागणी केली. शेतात पाणी न मिळाल्यामुळे भाजीपाला पिके वाया जात असून, आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तरीही विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या बैठकीत वीज
वितरण विभागाने दोन दिवसांची मुदत मागितली असून, तोपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यास कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा तीव्र इशारा उमेश भुजाडणे यांनी दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर कार्यालय ताब्यात घेऊन वीज मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही.
निवेदन देताना शेतकरी अजयराव समरीत, रामेश्वर सरोदे, विजयराव वानखडे, बंडू भोयर, चंद्रभानजी तडस, लीलाधर वानखडे आदी उपस्थित होते. या प्रकारामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी असून, वीज वितरण विभागाने तत्काळ पावले उचलावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.