चिखलदरा पर्यटन स्थळी ये जा करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करा - जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती - दि. 26
चिखलदरा हे एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ असून येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. प्रामुख्याने शनिवार व रविवार मोठ्या प्रमाणात पर्यटक वाहनांनी चिखलदरा येथे येत असतात. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असते. त्याअनुषंगाने पर्यटकांनी चिखलदार पर्यटन स्थळी जाण्यायेण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम व मोटार वाहन कायदा अन्वये 28 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या कालावधीतील दर आठवडयाचे शनिवार व रविवार या दिवशी चिखलदरा येथे येण्यासाठी परतवाडा ते चिखलदरा या मार्गावरील वाहतुक ही परतवाडा वरून धामणगाव मार्गे चिखलदरा या मार्गाने तर चिखलदरा येथून जाण्यासाठी चिखलदरा ते परतवाडा या मार्गावरील वाहतुक घटांग, परतवाडा या प्रकारे एक मार्गी (वन-वे) वळविण्याचे आदेश श्री. येरेकर यांनी निर्गमित केलेले आहे.
चिखलदार पर्यटन स्थळी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या पावसाळ्यातील तीन महिन्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. प्रामुख्याने आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक चारचाकी, दुचाकी, ऑटो, ट्रॅव्हर्ल्स, बस अशा वाहनांनी चिखलदरा येथे येत असतात. प्रामुख्याने पर्यटक हे चिखलदरा ते परतवाडा या मार्गाचा वापर करतात. हा रस्ता अरूंद असून नागमोडी वळणाचा आहे. चिखलदरा हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येत असून जंगलातील वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात संचार करीत असल्याने रस्त्यावर येतात. त्यामुळे वन्यप्राण्यांसोबतही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने परतवाडा ते चिखलदरा मार्गावरील येणारी व जाणारी वाहतुक एक मार्गी (वन-वे) वळविण्यात आली आहे. चिखलदारा पर्यटनस्थळी जाताना पर्यटकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.