नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापक वडिलांकडून मुलीची हत्या

नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापक वडिलांकडून मुलीची हत्या
सांगली- 
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली आहे. नेलकरंजी गावात नीट (NEET) चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या रागातून एका वडिलांनी आपल्याच मुलीला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणात पित्याला अटक करण्यात आली आहे.

ही दुर्दैवी घटना साधना भोसले या बारावीतील विद्यार्थिनीच्या बाबतीत घडली आहे. विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या साधनाचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. मात्र नीटच्या चाचणी परीक्षेत तिला अपेक्षित गुण मिळाले नाहीत. त्यामुळे तिचे वडील धोंडीराम भोसले – जे स्थानिक खाजगी शाळेत मुख्याध्यापक आहेत – हे अत्यंत संतापले.
साधना दोन दिवसांपूर्वीच घरी आली होती. शुक्रवारी रात्री 9.30 च्या सुमारास तिला जात्याच्या लाकडी खुंट्याने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली. विशेष म्हणजे तिच्या प्रकृतीची कोणतीही दखल न घेता दुसऱ्या दिवशी तिचे वडील ‘योग दिन’ साजरा करण्यासाठी शाळेत गेले. घरी परतल्यावर त्यांनी साधनाला बेशुद्ध अवस्थेत आढळून दिलं आणि तेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

साधनाची आई प्रीती भोसले यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपी वडील धोंडीराम भोसले यांना रविवारी अटक करण्यात आली आहे.

साधना ही अतिशय बुद्धिमान विद्यार्थिनी होती. दहावीमध्ये तिने 95 टक्के गुण मिळवले होते. पण एका चाचणी परीक्षेत अपेक्षेपेक्षा थोडे गुण कमी मिळाले, आणि त्यासाठी तिला तिच्या आयुष्याची किंमत मोजावी लागली. ही घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारी आहे.

प्रश्न विचारणारा काळा आरसा... शिक्षणाची गुणवत्ता, गुणांची चढाओढ आणि अपयश पचवण्याची क्षमता यावर समाज पुन्हा विचार करेल का? एका शिक्षण संस्थेचा प्रमुख असलेला व्यक्ती जर स्वतःच्या मुलीशी असे वागतो, तर शिक्षण क्षेत्राच्या मूल्यांवरच प्रश्नचिन्ह उभे राहते.
भावपूर्ण श्रद्धांजली