मित्राची आदी हत्या केली , नंतर अपघाताचा बनाव रचला; गोव्याला पळून जाताना पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

मित्राची आदी हत्या केली , नंतर अपघाताचा बनाव रचला; गोव्याला पळून जाताना पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

अहिल्यानगर तालुक्यात येणारे गुंडेगाव या गावात जवळच्या मित्रानेच आपल्या मित्राचा खून केला, जुन्या वाद विकोपाला जाऊन भांडणातून हे हत्याकांड घडलं. घटनेतील आरोपींनी देविदास शिंदे यांचा पाठलाग करून चाकू आणि दांडक्याने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांनी अपघाताचा बनाव रचून गोव्याला पळून जाण्याचा प्रयत्न फसला, पोलिसांनी मात्र तिघांनाही अटक केली.

अहिल्यानगर : तालुक्यातील गुंडेगाव येथे जुन्या वैमनस्यातून मित्रानेच मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (१५ जून २०२५) दुपारी घडली. देविदास बळीराम शिंदे (वय ३०) याला मित्र राहुल दिलीप राऊत आणि त्याच्या साथीदारांनी चारचाकीने पाठलाग करून, धारदार चाकू आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून ठार मारले. या खुनानंतर आरोपींनी अपघाताचा बनाव रचला आणि गोव्याला पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु अहिल्यानगर तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत सुपा-शहाजापूर रस्त्यावरील डोंगरात सिनेस्टाईल पाठलाग करून तिघांना अटक केली.

देविदास बळीराम शिंदे याचा निर्घृण खून झाला. मृत देविदास आणि आरोपी राहुल दिलीप राऊत हे एकमेकांचे मित्र होते, परंतु काही दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते. या वैमनस्याचा बदला घेण्यासाठी राऊतने आपल्या साथीदारांसह देविदासचा खून करण्याचा कट रचला. आरोपींमध्ये राहुल दिलीप राऊत (रा. भैरवनाथ मंदिरामागे, गुंडेगाव), डॅनियल येशुदास जावळे (रा. तुकाईमळा, गुंडेगाव), आणि अमोल चंद्रकांत भुजबळ (रा. माळवस्ती, वडगाव तांदळी) यांचा समावेश आहे. मृताचा भाऊ लक्ष्मण शिंदे यांनी अहिल्यानगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला.

हत्या करुन गोव्याला पळणार होते तेवढ्यात...

देविदास शिंदे गुंडेगाव येथून चारचाकीने देऊळगाव सिद्धीकडे निघाला होता. त्याचवेळी राहुल राऊत आणि त्याच्या साथीदारांनी चारचाकीने त्याचा पाठलाग सुरू केला. जीव वाचवण्यासाठी देविदासने आपली चारचाकी वेगाने पळवली, परंतु आरोपींनी त्याच्या वाहनाला जोरदार धडक दिली, ज्यामुळे देविदासची चारचाकी उलटली. यानंतर आरोपींनी देविदासला पकडून धारदार चाकूने सपासप वार केले आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या क्रूर हल्ल्यात देविदासचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावर अपघाताचा बनाव रचला आणि चारचाकीने पसार झाले. त्यांनी गोव्याला पळून जाण्याचा बेत आखला होता, परंतु पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांचा हा डाव फसला.

हत्या केली, पण अपघाताचा बनाव रचला -

आरोपींनी घटनेचा अपघाताचा बनाव रचला होता, ज्यामुळे प्रथमदर्शनी हा खून अपघात वाटावा. त्यांनी मृताच्या चारचाकीला धडक देऊन ती उलटवली आणि मारहाण करून खून केला. घटनास्थळावरून पसार झाल्यानंतर ते सुपा-शहाजापूर रस्त्यावरील डोंगरात लपून बसले होते, आणि गोव्याला पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी तिघांना अटक केल्यानंतर चौकशीत त्यांनी खुनाची कबुली दिली. त्यांनी जुन्या वैमनस्यातून आणि नियोजित कट रचून हा खून केल्याचे कबूल केले.

डोंगराळ भागात लपलेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं

अहिल्यानगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, आरोपी गोव्याला पळून जाण्याच्या तयारीत असून, ते सुपा ते शहाजापूर रस्त्यावरून प्रवास करत आहेत. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सुपा-शहाजापूर रस्त्यावरील डोंगराळ भागात पाठलाग सुरू केला. रात्री उशिरा पोलिसांना डोंगरात आरोपींची चारचाकी आढळली. पोलिसांनी जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता, तिघेही वेगवेगळ्या दिशेने पळून गेले. पोलिसांनी धैर्याने पाठलाग करत राहुल राऊत आणि अमोल भुजबळ यांना ताब्यात घेतले, तर डॅनियल जावळे गवतात लपला होता, त्याला नंतर पकडण्यात आले.