मैत्रिणीसोबत फिरायला गेलेल्या युवकाला दरोडेखोरांनी लुटले

मैत्रिणीसोबत फिरायला गेलेल्या युवकाला दरोडेखोरांनी लुटले


■ बोरनदी प्रकल्पाजवळ दहा दरोडेखोरांचा धुमाकूळ
रोकड व सोनसाखळीसह ५० हजारांचा ऐवज लुटला

नांदगाव पेठ/प्रतिनिधी

      येथून जवळच असलेल्या वाळकी रोडवरील बोरनदी प्रकल्पाजवळ  मैत्रिणीसोबत फिरायला गेलेल्या एका युवकावर दहा दरोडेखोरांनी जबरदस्तीने हल्ला करून सोनसाखळी व रोख रक्कम हिसकावून नेल्याची गंभीर घटना घडली.६ जूनच्या सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला असून दरोडेखोरांनी तब्बल ५० हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची तक्रार संबंधित युवकाने  नांदगाव पेठ  पोलीस स्टेशनमध्ये दिली.पोलिसांनी घटनेची तातडीने दखल घेत तपासयंत्रणा दरोडेखोरांच्या शोधात निघाले आहे.
    सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण झालेला व सध्या खाजगी काम करणारा यशोदा नगर  अमरावती मधील एक २७ वर्षीय तरुण आपल्या मैत्रिणीसह ६ जून रोजी दुपारी साडे पाच वाजता अंबागेट अमरावती येथून वाळकी रोडवरील बोरनदी प्रकल्पाकडे फिरायला गेले होते. तिथे फिरून झाल्यानंतर सात वाजताच्या दरम्यान ते दोघे  घरी परतताना कच्च्या रस्त्यावर दोन दुचाकी आणि एक मोपेडवर आलेल्या दरोडेखोरांनी त्यांची दुचाकी अडवण्याचा प्रयत्न केला.
    युवकाने गाडी थांबवण्याचे टाळले असता पुढे आणखी एक दुचाकी आडवी लावून चौघेजण उभे होते. त्यांनी युवकाची गाडी थांबवताच हल्ला चढवला. अचानकपणे तिघांनी युवकाला हाताबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी त्यांच्या दुचाकीच्या बाजूला असलेली काळ्या रंगाच्या बॅग मधील  पाकीटातून तीन हजार  रुपयांची रोख रक्कम, मोबाईल कव्हरमधील पंधराशे  रुपये, तसेच गळ्यातील ९.८५ ग्रॅमची  सोन्याची साखळी  किंमत सुमारे  ४५ हजार रुपये असा एकूण ४९,५००  रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आला.
    घटनेनंतर सर्व दहा अनोळखी इसम त्यांच्या दुचाकीने  घटनास्थळावरून फरार झाले. युवकाने तातडीने नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये  आपली तक्रार नोंदवली.पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली आहेत.


सिसिटीव्ही फुटेजची तपासणी

    घटनेची माहिती मिळताच तातडीने एक पथक दरोडेखोरांच्या शोधार्थ पाठवले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात येत आहे.बोरनदी प्रकल्पाजवळ सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाला कळविले आहे. परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

महेंद्र अंभोरे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पो.स्टे. नांदगाव पेठ



सुरक्षेचा अभाव

बोरनदी प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून याठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्याने कोणीही थेट धरणावर जाऊन पाण्यात उतरण्याचे प्रकार घडतात. सेल्फीच्या व पोहण्याच्या नादात याठिकाणी अनेकांनी जीव देखील गमावला आहे.याबाबत माध्यमांनी अनेकदा मुद्दा उचलला मात्र सिंचन विभागाने यांबत कोणतीही दखल किंवा दक्षता घेतलेली नाही हे विशेष!