ग्रामपंचायत सभागृहात गाजला विजेचा मुद्दा
अभियंता बेहरे व नागरिक आमने-सामने
■ पंधरा दिवसांत सुधारणा करण्याचे आश्वासन
नांदगाव पेठ / प्रतिनिधी
महिनाभरापासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी दोन दिवसांपासून वीज वितरण कार्यालयाला घेराव घालत अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकारी जागेवर उपस्थित नसल्याने मंगळवारी ग्रामपंचायत सभागृहात महावितरणचे नांदगाव पेठ येथील अभियंता गजानन बेहरे यांना पाचारण करण्यात आले होते.यावेळी अभियंता आणि नागरिक यांच्यामध्ये तू तू मै मै झाल्यांनंतर ग्रामपंचायत प्रशासनाने मध्यस्थी करत तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देत नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देण्याची विनंती यावेळी केली.
या बैठकीत अभियंता बेहेरे यांनी स्पष्ट केले की, अनेकदा नैसर्गिक आपत्ती, लांब अंतरावरून होणारा वीजपुरवठा, इन्सुलेटर तुटणे अशा कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होतो. नांदगाव पेठ मध्ये लालखडी व शिराळा येथून वीजपुरवठा असल्याने या दोन्ही भागांमध्ये वीज पुरवठा होत असतांना अनेक तांत्रिक अडचणी येतात मात्र येत्या पंधरा दिवसात सर्व अडचणी दूर करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन यावेळी अभियंता बेहरे यांनी उपस्थितांना दिले.
या बैठकीस तंटामुक्ती समिती अध्यक्ष संजय चौधरी, उपसरपंच मजहर खा, सफदर खा, ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे, सदस्य शिवराजसिंह राठोड, किशोर नागापुरे, छत्रपती फटके, वृषाली इंगळे, आशा चंदेल, विनोद डांगे, नितीन सत्रे, किशोर राऊत, शशी बैस, अमोल व्यवहारे यांची उपस्थिती होती.बैठकीत वीजपुरवठ्याबरोबरच पाण्याच्या समस्येबाबतही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी बेहरे यांनी कर्मचारी संख्या कमी आणि कामाचा ताण अधिक असल्याचे स्पष्ट करत ग्रामस्थांची सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
चौकट
वारंवार फोन करू नये- अभियंता बेहरे
नांदगाव पेठ ३३ केव्ही लाईनवर सध्या भार खूप वाढलेला आहे, त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, त्याबाबत कार्यवाही सुरू आहे आणि मी स्वतः नांदगावपेठ बातमीपत्र व ग्रामवासी समूहावर नियमितपणे माहिती देत असल्याचे त्यांनी नमूद केले.लाईट गेल्यानंतर वारंवार फोन करू नये,कर्तव्यावर असताना फोन उचलता येत नाही, यासाठी त्यांनी उपस्थित नागरिकांची समजूत घातली आणि असुविधेबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. "शंभर टक्के प्रयत्न करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असा शब्दही त्यांनी दिला.
गेल्या अनेक दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार संताप निर्माण करणारा आहे. त्याहीपेक्षा संतापजनक प्रकार म्हणजे अधिकारी आणि कर्मचारी यांचे सहकार्य त्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने वीज वितरण कार्यालयाला आम्ही घेराव घातला होता. आज झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी त्यांची बाजू मांडली व गावकऱ्यांचे समाधान केले मात्र यावर कायमचा तोडगा निघायला हवा अन्यथा पुन्हा गावकरी पेटून उठतील व वलगाव सारखी स्थिती येथील कार्यालयाची होईल.
प्रा. मोरेश्वर इंगळे