केंद्रप्रमुख, सरपंच यांच्या दौऱ्यात मुख्याध्यापक,शिक्षक गैरहजर

केंद्रप्रमुख, सरपंच यांच्या दौऱ्यात मुख्याध्यापक,शिक्षक गैरहजर

■ माजी जि.प.सदस्य नितीन हटवार यांची कारवाईची मागणी

नांदगावपेठ/प्रतिनिधी

     येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या कारभाराचा भोंगळपणा नुकत्याच झालेल्या अचानक भेटीत उघडकीस आला आहे. केंद्रप्रमुख, सरपंच तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या संयुक्त भेटीत शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या अनुपस्थितीमुळे शिक्षणाचा सुरू असलेला खेळखंडोबा समोर आला आहे.
    सकाळी ११ वाजता शाळा सुरू होण्याची वेळ असतानाही साडेदहा वाजेपर्यंत एकही शिक्षक शाळेत उपस्थित नव्हता. मुख्याध्यापक देवेंद्र ठाकरे हे देखील दहा वाजून चाळीस मिनिटांनी शाळेत आले. उर्वरित शिक्षक मात्र थेट ११ वाजता शाळेत पोहोचले. विशेष म्हणजे मुख्याध्यापक यांच्या हजेरी रजिस्टरवरील मागील तीन दिवसांच्या सह्याही केल्या नव्हत्या हे विशेष.११ वाजता तास सुरू होण्याची वेळ असतांना शिक्षक चक्क ११ वाजता शाळेच्या प्रांगणात पोहचत आहे ही बाब शिक्षण विभागाची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे. शाळेचे सत्र सुरू झाल्यापासून शाळेत नवनवीन उपक्रमांची सुरुवात झाली आहे मात्र या शाळेत कोणत्याही प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले नसल्याची खंत शिक्षण अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
    एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करणे गरजेचे असतांना कुठेही हा  उपक्रम राबविण्यात आला नसल्याचे दिसून आले.तर प्रत्येक खेळाचे मैदान आखण्याचे शासनाचे निर्देश देखील मुख्याध्यापकांनी पायदळी तुडविल्याचा आरोप यावेळी उपस्थितांनी केला.या भेटीत केंद्रप्रमुख पटेल सह सरपंच कविता डांगे, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन हटवार, पालक प्रतिनिधी मनोज मोरे आणि अरुण राऊत हे उपस्थित होते. त्यांनी शाळेतील शिस्त आणि शिक्षकांच्या अनागोंदी कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.या प्रकारामुळे शाळेतील शैक्षणिक वातावरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित शिक्षकांवर कारवाईची मागणी यावेळी नितीन हटवार यांनी केली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज-नितीन हटवार

मी जि.प सदस्य असतांना या शाळेची पटसंख्या १३५० होती मात्र शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या हलगर्जीपणामुळे ही संख्या कमी होऊन आता केवळ ६०० एवढीच राहलेली आहे. शासनाचे गलेलठ्ठ वेतन घेऊन विद्यार्थी संख्या न टिकविण्याऱ्या अश्या शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत माजी जि प सदस्य नितीन हटवार यांनी केली आहे. विद्यार्थी कमी होणे ही बाब शाळेसाठीच नाही तर परिसरासाठी दुर्दैवी असल्याचे देखील ते म्हणाले.