नांदगाव पेठ येथील वीज वितरण कार्यालयावर मध्यरात्री धडक !

नांदगाव पेठ येथील वीज वितरण कार्यालयावर मध्यरात्री धडक !

■ प्रा. मोरेश्वर इंगळे यांच्या नेतृत्वात संतप्त ग्रामस्थांचा मोर्चा

नांदगावपेठ / प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून सतत खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांचा उद्रेक अखेर रविवारी मध्यरात्री उफाळून आला.  प्रा. मोरेश्वर इंगळे यांच्या नेतृत्वात संतप्त ग्रामस्थांनी रात्री १ वाजता वीज वितरण कार्यालयावर धडक दिली, आणि बेजबाबदार प्रशासनाला धारेवर धरले..
   महिनाभरापासून वीजपुरवठ्याच्या लपंडावामुळे नागरिक, अबालवृद्ध, लहान मुले प्रचंड त्रस्त झाले आहेत. 
रविवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता.संपूर्ण दिवस विजेशिवाय राहल्यानंतर रात्री सुद्धा एक वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने अखेर  प्रा. मोरेश्वर इंगळे यांच्या नेतृत्वात गावकरी वीज वितरण कार्यालयावर धडकले. मात्र, याठिकाणी कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता.अभियंता बेहरे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अशोभनीय भाषा वापरून नागरिकांचा अपमान केला, ज्यामुळे संतप्त ग्रामस्थ आणखी आक्रमक झाले.
     कोणताही वादळवारा नसतांना दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असून खासगी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर अभियंता बेहरे कारभार सोडून जातात.वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्यास अभियंता बेहरे यांना याबाबत सुद्धा माहिती नसते ही बाब अत्यंत बेजबाबदारपणाची आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु असून गावकरी नागरिक मात्र या सततच्या वीजपुरवठामुळे संतप्त झाले आहेत.विभागाने नागरिकांच्या या समस्येचा तोडगा काढावा अशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे.
अभियंता बेहरे यांची हकालपट्टी करा
अभियंता बेहरे यांची तात्काळ हकालपट्टी करून, जनतेच्या सेवेस तत्पर अधिकारी येथे नेमावेत.नागरिकांच्या संयमाचा अंत आता विभागाने  बघू नये. वीज वितरण कंपनीने तात्काळ अभियंता बेहरे सारख्या बेजबाबदार अधिकाऱ्यांची बदली करावी अन्यथा वीज वितरण कार्यालय येथे तीव्र आंदोलन छेडले जाईल.
प्रा. मोरेश्वर इंगळे