एमआयडीसीच्या विरोधात अन्यायग्रस्त शेतकऱ्याचा उपोषणाचा इशारा

एमआयडीसीच्या विरोधात अन्यायग्रस्त शेतकऱ्याचा उपोषणाचा इशारा
■ कृषी दिनापासून ज्ञानेश्वर बारस्कर करणार आमरण उपोषण

नांदगाव पेठ / प्रतिनिधी


    नांदगाव पेठ येथील शेतकरी ज्ञानेश्वर बारस्कर हे गेल्या नऊ वर्षांपासून शेतीच्या नुकसान भरपाईसाठी लढा देत आहेत. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आता त्यांनी कृषी दिनी म्हणजेच 1 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
    बारस्कर यांच्या शेतात एमआयडीसी मधून निघणारे दूषित सांडपाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. 2016 पासून त्यांनी विविध शासकीय कार्यालये, मंत्री व आमदार यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली. परंतु कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे ते आजही नुकसान भरपाईपासून वंचित आहेत.
   औद्योगिक विकास महामंडळ, अमरावती यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांकडून बारस्कर यांच्या शेताचे पुनर्मूल्यांकन करून अहवाल मागविला होता. मात्र अहवाल सादर होऊनही अद्याप नुकसान भरपाईचा मोबदला न मिळाल्यामुळे बारस्कर यांनी 30 जूनपर्यंत नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा 1 जुलैपासून उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
   विशेष बाब म्हणजे ज्ञानेश्वर बारस्कर हे अर्धांगवायूने ग्रस्त असूनही आपल्या हक्कासाठी त्यांनी हा संघर्ष सुरू ठेवला आहे. त्यांच्या जीवितास काही धोका निर्माण झाल्यास याला संपूर्णपणे शासन जबाबदार राहील, असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.