जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळ पोरकी झाली...
श्रीराम देशपांडे यांचे दुःखद निधन
नांदगाव पेठ / प्रतिनिधी
अमरावती जिल्हा ग्रंथालय संघाचे ज्येष्ठ कार्यवाह, ग्रंथालय चळवळीचे आधारस्तंभ आणि भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे श्रीराम देशपांडे यांचे आज (दि.१८ जून) दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्याच्या ग्रंथालय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
मुळगाव अंजनगाव सुर्जी येथे ते वास्तव्यास होते. दुपारी अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवार, दि. १९ जून रोजी देशपांडे वाडा, अंजनगाव सुर्जी येथून त्यांची अंत्ययात्रा निघेल व अंजनगाव सुर्जी येथील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होईल.
श्रीरामदेशपांडे यांनी अनेक दशके जिल्हा ग्रंथालय संघाच्या माध्यमातून वाचन संस्कृती व ज्ञानप्रसारासाठी अतुलनीय योगदान दिले. त्यांनी ग्रंथालय कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करून ग्रामीण भागात वाचन संस्कृतीचा प्रसार केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक लहान गावांमध्ये ग्रंथालये स्थापन झाली.त्यांच्या निधनामुळे “जिल्ह्याची ग्रंथालय चळवळ पोरकी झाली” अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. अनेक संस्थांनी आणि वाचनालयांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
जिल्ह्यातील वाचनसंस्कृतीचा खरा शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेला अश्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.