अतिसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

■ अतिसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम
■ जिल्हास्तरीय जनजागृती मोहिमेचे नांदगाव पेठ येथे उद्घाटन

नांदगाव पेठ / प्रतिनिधी

  मान्सूनपूर्व परिस्थितीत अतिसारासारख्या आजारांचा धोका वाढत असतो. याला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “स्टॉप डायरिया कॅम्पेन या जिल्हास्तरीय जनजागृती मोहिमेचे उद्घाटन नांदगाव पेठ येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरात उत्साहात पार पडले.मोहीमेअंतर्गत घरोघरी अतिसार या रोगाबाबत जनजागृती करण्यात येणार असून अतिसार प्रतिबंधासाठी औषधे व माहितीपत्रक वाटप करण्याचे देखील नियोजन करण्यात आले आहे.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पारीसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लकडे मॅडम, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शिंदे मॅडम,नांदगाव पेठ ग्रामपंचायतच्या  ग्रामपंचायत अधिकारी हर्षदा  बोंडे, प्राथमिक आरोग्य केंद्र, माहुली जहागीर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा राऊत आणि डॉ. मंगला मोहोड आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.यावेळी सहायक आरोग्य अधिकारी संजय पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, अतिसार हा बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच बाधू शकणारा संसर्गजन्य आजार आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वच्छता, सुरक्षित पाणी आणि संतुलित आहार आवश्यक आहेत. त्यांनी मोहिमेत सर्व घटकांनी सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
    या मोहिमेचे आयोजन समुदाय आरोग्य अधिकारी सौरभ पाटील, आरोग्य सेवक मोहम्मद मुझफ्फर व अभिलाष टेकाडे, तसेच आरोग्य सेविका आम्रपाली चव्हाण, ललिता मेश्राम, ढोले मॅडम यांच्यासह सर्व आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांच्या सहकार्याने अतिशय नियोजनबद्ध रितीने करण्यात आले.या मोहिमेला गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.