नागरिकांनी राज्यस्थानचे राज्यापाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा अडवला

नागरिकांनी राज्यस्थानचे राज्यापाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा अडवला 
संभाजीनगर - 
ज्यांची घरे-दुकाने पाडली गेली त्या नागरिकांनी रविवारी (ता. २२) राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा अडवत आपले गाऱ्हाणे मांडले. अचानक झालेल्या या प्रकाराने पोलिस यंत्रणेचे धाबे दणाणले.
त्यांनी राज्यपालांचा ताफा बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. याचवेळी तेथे अतिक्रमण पाडलेल्या नागरिकांच्या भेटीसाठी आलेल्या माजी खासदार इम्तियाज जलील यांनी धाव घेत तेथील लोकांना समजावत बागडे यांच्या ताफ्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. दरम्यान, या प्रकारामुळे संतापलेल्या पोलिस आयुक्तांनी कठोर कारवाईचा इशारा दिला. पण, राज्यपाल बागडे यांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल न करण्याची सूचना केली.

दोन दिवसांपूर्वी संजयनगर, मुकुंदवाडी कमानीजवळील अतिक्रमणे हटवल्याने या भागातील नागरिक संतापले आहेत. या नागरिकांचा रोष रविवारी (ता. २२) पाहायला मिळाला. दुपारपासून आंदोलक रस्त्यावरच होते. त्यातच माजी खासदार इम्तियाज हे ज्यांच्या मालमत्ता पाडल्या त्यांना भेटायला आले होते. ते संजयनगरात नागरिकांच्या भेटीगाठी घेत असताना इकडे मुख्य रस्त्यावर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा आला. त्यांचा ताफा पाहताच अनेक महिला पुढे सरसावल्या आणि त्यांनी बागडे यांचा ताफा अडवला. या प्रकाराने तेथे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी तातडीने धाव घेत ताफा सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. धक्काबुक्कीचा प्रकारही घडला. तेवढ्यात इम्तियाज मुख्य रस्त्यावर आले. त्यांनी गर्दीत घुसून नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीही संयमाची भूमिका घेतल्याने अखेर राज्यपाल बागडे यांच्या ताफ्याला मार्ग करून देण्यात आला.

पोलिस आयुक्त प्रवीण पवार तेथे आले. त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारीही होते. त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले; तसेच ताफा अडविला त्यांच्याविरोधात गंभीर गुन्हे नोंद करणार आहे, यानंतरही ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होईल तिथे तिथे कोणीही आडवे आले तर कोणाचीच गय केली जाणार नाही,' असे ठणकावून सांगितले.

आयुक्त, जिल्हाधिकारी राज्यपालांकडे

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा अडवल्याच्या प्रकाराची चर्चा झाल्यानंतर पोलिस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी थेट राज्यपाल बागडे यांच्या घरी जात भेट घेतली. या भेटीबाबत बागडे यांना 'सकाळ'ने विचारले असता ते म्हणाले, ''माझा ताफा येत असताना लोकांना मंत्र्यांचे वाहन वाटले. त्यामुळे त्यांनी ते अडवले. त्यानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वाहन मंत्र्यांचे नसून, राज्यपालांचे असल्याचे सांगत त्यांना बाजूला केले. नागरिकही बाजूला झाले.'' त्यानंतर उपस्थितांनी, 'नाना, आपण आमच्या मतदारसंघाचे आमदार असताना कधी असा प्रकार झाला नाही. कधी आमची घरे अतिक्रमणात नव्‍हती, आता ही कारवाई का?' अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल करू नका, असेही बागडे यांनी पोलिस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

इम्तियाज जलील संतापले

शहरातील पोलिस प्रशासन आणि महापालिकेचे अधिकारी गुंडांसारखे वागू लागले आहेत. अतिक्रमण काढण्याची ही कुठली पद्धत? नोटीस नाही, सूचना नाही आणि थेट बुलडोझर फिरवला. पावसाळ्यात अतिक्रमित घरांवर कारवाई करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. तेदेखील एका नेत्याच्या फोनवरून पोलिस आणि मनपा प्रशासनाने पायदळी तुडवले. तुम्ही नियमाप्रमाणे काम करणार की नेत्याच्या मनाप्रमाणे? असा सवाल माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. मुकुंदवाडी भागात महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात शेकडो घरे, दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईच्या विरोधात या भागातील लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. आज एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या भागाला भेट देत तेथील नागरिक आणि छोटे-मोठे व्यापारी, दुकानदारांशी चर्चा केली. भाजप आमदाराने एक फोन केला आणि सगळे जमीनदोस्त करून टाका, असे फर्मान सोडले अन् ही कारवाई करण्यात आली, असा आरोप जलील यांनी केला.