महिला आयोग महिलांच्या सुरक्षित आणि आरोग्यदायी वारीसाठी सज्ज आहे , - रुपाली चाकणकर
मुबंई-
राज्य महिला आयोगाच्या आरोग्य वारीचे यंदाचे चौथे वर्ष असून महिलांच्या सुरक्षित आणि आरोग्यदायी वारीसाठी प्रशासन सज्ज आहे, असा विश्वास आजच्या प्रशासकीय आढावा बैठकीनंतर व्यक्त केला.
पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने लाखो वारकऱ्यांचा पंढरपूरच्या दिशेने प्रवास काही दिवसातच सुरू होणार आहे. वारकरी महिलांचा प्रवास सुरक्षित आणि आरोग्यदायी व्हावा, यासाठी पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील पोलिस आणि प्रशासनाने सज्ज रहावे यासाठी आज ऑनलाईन बैठकीद्वारे आयोगाची अध्यक्ष या नात्याने पिंपरी चिंचवड, पुणे, सातारा, सोलापूर प्रशासनकडून त्यांच्या तयारीची माहिती घेतली.
वारी काळात महिलांसाठीच्या सुरक्षेसाठी पोलिस आणि प्रशासन यांच्याकडून देखील आज ऑनलाइन बैठकीत आढावा घेतला. आषाढी वारीमध्ये पांडुरंगाच्या ओढीने लाखो महिला वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत असतात. त्यांची वारी आरोग्यदायी आणि सुरक्षित व्हावी यासाठी राज्य महिला आयोगाकडून गेले तीन वर्ष आरोग्य वारी हा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. पुणे, सातारा, सोलापूर प्रशासनाच्या सहकार्याने वारी मार्गावर हिरकणी कक्ष, सॅनिटरी पॅड वेंडिंग बर्निंग मशीन, डॉक्टरांचे फिरते पथक, पुरेसे फिरते शौचालये, न्हाणीघर, निवारा गृह यासह सुरक्षेच्या दृष्टीने निर्भया पथकाची गस्त, साध्या वेषातील पोलिसांचा बंदोबस्त, दर्शनी भागात हेल्पलाईन क्रमांक फलक अशा सुविधा देण्यात येत आहेत.
या बैठकीत आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे उपस्थित होत्या. पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांचे प्रतिनिधी यांनी स्थानिक पातळीवर तयारीची माहिती दिली.
महिला वारकऱ्यांचा विठ्ठलाच्या ओढीने सुरू असलेला प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हायला हवा. आपण सर्वांनी तयारी करताना केवळ प्रशासकीय बाब म्हणून काम न करता त्यांचा भावनांचा विचार करावा. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच आपली पांडुरंग चरणी सेवा आहे या भावनेने आरोग्य वारीचे नियोजन करावे.