सहा गावांचा प्रभार एकाच ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे
■ भातकुली बीडीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची मनमानी
नागरिकांमध्ये संताप
अमरावती / प्रतिनिधी
भातकुली पंचायत समिती प्रशासनावर पुन्हा एकदा पक्षपातीपणाचे आरोप होत असून, तब्बल सहा गावांचा कारभार एका ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. आठवड्याचे केवळ पाचच दिवस काम.त्यापैकी भातकुली कार्यालयात दोन दिवस आणि उर्वरित तीन दिवस गावपातळीवरील कामकाजासाठी देणे अनिवार्य आहे. मात्र सहा गावांची जबाबदारी एकाच अधिकाऱ्यावर दिल्यामुळे प्रत्यक्षात एका गावाचा कारभार महिन्यातून केवळ एकदाच पाहिला जातो आहे का असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे.
या अव्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे शाळा दाखले, नागरिकांचे उत्पन्न व राहण्याचे दाखले, वृद्धांच्या निवृत्तीवेतन संदर्भातील कामकाज यावर विपरित परिणाम होत आहे. दुसरीकडे, या ग्रामसेवकाचे स्थानिक कंत्राटदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेले सलोख्याचे संबंध लक्षात घेता, हा प्रभार मुद्दामच त्याच्यावर सोपवण्यात आल्याची चर्चा आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, ग्रामपंचायत अधिकारी कार्यालयात अनुपस्थित असल्यामुळे शासकीय योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करता येत नाहीत. कामासाठी वारंवार तहसील किंवा तालुका कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. यामुळे ग्रामविकासाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत असून, याचा थेट फायदा कंत्राटदारांना होत आहे, असे आरोप नागरिकांनी केले.
या आधी पाच गावांचा प्रभार असतांना नुकताच त्यांना अजून एका गावाचा प्रभार सुद्धा संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांचेकडे देण्यात आला. पंचायत सनीतीचे बीडीओ, विस्तार अधिकारी या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या 'पार्टीचे' भागीदार असल्याने अहवाल सुद्धा अत्यंत चांगलाच मिळतो अशी चर्चा सुरू आहे.या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या विरोधात अनेकदा तक्रारी करून सुद्धा नेहमी प्रशासन खिशात असल्यामुळे आजवर या ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही हे विशेष!
निष्काळजी प्रशासनावर कारवाईची मागणी
या सर्व प्रकाराची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.