नांदगाव पेठ/प्रतिनिधी
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी यावली शहीद येथे तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाने व मंडळ कृषी अधिकारी निता कवाणे यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप पूर्व नियोजन सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी ज्योती ठाकरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत खरीप हंगामाची सखोल पूर्वतयारी कशी करावी, याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी बियाण्यांची योग्य निवड, बीज प्रक्रिया, माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन, शून्य मशागत तंत्रज्ञान, रुंद सरी वरंबा तंत्रावर आधारित सोयाबीन लागवड यासारख्या आधुनिक पद्धतींचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले. तूर पिकासाठी नावीन्यपूर्ण बेड पद्धतीने पेरणी, कपाशीच्या लागवडीसाठी सुधारित पट्टा पद्धती व सघन लागवड, संत्रा फळपीक लागवडीबाबतही माहिती देण्यात आली.
या बैठकीत महाडीबीटी अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानित व प्रात्यक्षिक बियाण्यांसाठी अर्ज कसा करावा, 100 टक्के बी-बियाणे अनुदान योजनांचा लाभ कसा घ्यावा, तसेच ‘ॲग्री स्टॅक’ अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक व ‘पीएम किसान’ योजनेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत समाधानकारक चर्चा झाली.
या प्रसंगी गावच्या सरपंच शिल्पा खवले, आत्मा सदस्य प्रशांत टाकरखेडे तसेच मोठ्या संख्येने गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते. खरीप हंगाम पूर्व नियोजन सभा यावली शहीद अंतर्गत सर्व गावांमध्ये राबवण्यात येत असल्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत कृषी विभागाचे आभार मानले.