डिगरगव्हाण येथे पोकरा प्रकल्पांतर्गत सूक्ष्म नियोजन कार्यक्रम यशस्वी
नांदगाव पेठ / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत अमरावती तालुक्यातील डिगरगव्हाण गावात सूक्ष्म नियोजन प्रक्रिया उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडली. ,7 जून रोजी आयोजित या कार्यक्रमात हवामान अनुकूल शेती, मृद व जलसंधारण, पर्यावरण पूरक शेतीसारख्या बाबींवर भर देण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट शेतीस पूरक व्यवसायांना चालना देणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि भूमीची सुपीकता टिकवणे हे होते. या प्रक्रियेला लोकसहभागाचे स्वरूप देण्यासाठी गावबैठक, प्रभातफेरी, मशाल फेरी, लक्ष गट चर्चा व शीवार फेरी यासारखे उपक्रम राबविण्यात आले.
या उपक्रमात गावातील शेतकरी, महिला गट व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिला शेतकऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवित प्रकल्पाविषयी आपली मते मांडली. "हा प्रकल्प आमच्यासाठी शेतीतील नवी दिशा आणि विकासाचे साधन ठरेल," असे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे नियोजन ग्राम कृषि सहाय्यक कु. संगीता खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी कृषी पर्यवेक्षक नीतीन व्यवहारे व मंडळ कृषि अधिकारी शुद्धोधन वरघट यांनी पोकरा प्रकल्पातील योजनांची सविस्तर माहिती दिली. “पाण्याचा कार्यक्षम वापर आणि पोषणयुक्त तृणधान्यांचा अवलंब ही काळाची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात ग्रामपंचायत व ग्राम कृषि संजीवनी समितीच्या पदाधिकाऱ्यांची तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सरपंच सौ. जिलेश्वरी ठाकरे, उपसरपंच सौ. प्रज्ञा बाजारे, माजी सरपंच सौ. गोदावरी कडू यांच्यासह डॉ. शंकरराव ठाकरे, नरेंद्र कडू, आशीष कडू, संजय परसवार, सौ. पदमा परसवार, ईश्वरी कडू, गणेश परसवार, सोनाली घोगरे, माणिकराव मोहोड, बबनराव डाखोडे, सुरेशराव शेन्डे, रामराव मोहोड, भैय्या चौधरी, प्रभाकर घोगरे, प्रदीप गतफणे, शुभांगी चौधरी, अमोल जहाकार, पदमा कडू, शारदाताई दिंडेकर, अर्जुन सरोदे, कोकिळा डाखोडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
गावासाठी "संजीवनी" ठरणारा उपक्रम
डिगरगव्हाण गावात नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास करून हवामान अनुकूल शेतीसह मृद व जलसंधारण, कार्बन व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. "हा प्रकल्प गावासाठी खरी संजीवनी ठरेल," असा विश्वास शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.