नांदगाव पेठ- मंगेश तायडे
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, अमरावती अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या शेतकरी ओळख क्रमांक बाबत जनजागृतीसाठी यावली शहीद येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत यावली शहीद येथील सहाय्यक कृषी अधिकारी ज्योती ठाकरे यांनी फार्मर आयडीचे महत्त्व आणि त्यासंदर्भातील सविस्तर माहिती वाचनाद्वारे शेतकऱ्यांना दिली.
ग्रामसभेत पीएम किसान योजनेंतर्गत प्रलंबित लाभार्थींची यादी,मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड, पोकरा योजनेत कृषी ताईंची निवड अशा महत्त्वपूर्ण विषयांवरही चर्चा करण्यात आली.शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यासाठी 31 मे 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. या पार्श्वभूमीवर यावली शहीद गावात आतापर्यंत 65 टक्के नोंदणी झाली असून, अंतर्गत येणाऱ्या गावांपैकी औरंगपूर - 66%, भगवानपूर - 70%, नरसिंगपूर - 70%, देवापूर - 71% आणि भारतपूर - 69% इतकी नोंदणी पूर्ण झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांसाठी गावपातळीवर मुनादी देऊन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शिबिरदरम्यान शेतकरी बांधवांना फार्मर आयडीचे महत्त्व, त्याचे फायदे तसेच विविध योजनांसंदर्भातील माहिती जसे की प्रधानमंत्री किसान सन्माननिधी, नमो शेतकरी महासन्माननिधी, पीक कर्ज योजना, पीक विमा योजना, आपत्ती व्यवस्थापन अनुदान, आणि किमान आधारभूत किंमत खरेदी योजना — याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
उर्वरित शेतकरी बांधवांनी आपली नोंदणी पूर्ण करून शासनछ विविध योजनांचा लाभ घ्यावा , असे आवाहन यावली येथील सरपंच शिल्पा खवले, तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाने, मंडळ कृषी अधिकारी नीता कवाने, उपकृषी अधिकारी शुभांगी बोंडे आणि सहाय्यक कृषी अधिकारी ज्योती ठाकरे यांनी संयुक्तपणे केले आहे.