जिल्ह्यात आज 'एक दिवस बळीराजासाठी'

जिल्ह्यात आज 'एक दिवस बळीराजासाठी' अभियान
अमरावती, दि. 12 
जिल्ह्यात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा मिळाव्यात आणि त्यांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून शुक्रवार, दि. 13 जून रोजी 'एक दिवस बळीराजासाठी' अभियान राबविण्यात येणार आहे.

येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके योग्य दरात उपलब्ध व्हावीत, यासाठी हा एकदिवसीय उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात सर्व ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांची प्रत्येक कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी, कर्मचारी दिवसभर बियाणे, खते आणि कीटकनाशके विक्री केंद्रांवर उपस्थित राहतील.

या दिवशी कृषी निविष्ठांबाबतच्या तक्रारीमध्ये एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री, बियाणे, रासायनिक खतांसोबत इतर निविष्ठांची सक्तीची विक्री, बियाणे, रासायनिक खते उपलब्ध असूनही देणे टाळणे, अनधिकृत बियाण्यांची विक्री, बोगस कीटकनाशकांची विक्री, शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण आदी तक्रारी शेतकरी कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत संबंधित तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी (पंचायत समिती) यांच्याकडे करू शकतील.

तसेच तालुकास्तरीय 14 भरारी पथकातील सर्व सदस्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यांच्याकडे थेट तक्रार नोंदवता येईल. यासोबतच शेतकऱ्यांसाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. त्याचे क्यूआर कोड सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर लावण्यात आले आहेत. शेतकरी हे क्यूआर स्कॅन करून तक्रार नोंदवू शकतील.

व्हॉट्सॲपद्वारे तक्रार नोंदवण्यासाठी ८०८०५३६६०२ क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावर पथके स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हास्तरीय पथकात कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती हे पथकप्रमुख असतील आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, अमरावती हे सदस्य सचिव असतील. तालुकास्तरीय पथकात संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी हे पथकप्रमुख आणि कृषी अधिकारी (पंचायत समिती) हे सदस्य सचिव असतील.

बियाणे, खते आणि कीटकनाशके अधिकृत परवानाधारक कृषी निविष्ठा विक्री केंद्रातूनच रितसर पावती घेऊन खरेदी करावीत. कोणत्याही अनधिकृतपणे विकल्या जाणाऱ्या निविष्ठांना बळी पडू नये आणि कृषी निविष्ठा विक्री केंद्रातून बियाणे खरेदी करताना विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.