ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाईन अपिल सुनावणी

ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाईन अपिल सुनावणी
अमरावती, दि. 17 
आई वडील व ज्येष्ठ नागरिकांचा चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियमानुसार दाखल करण्यात आलेल्या अपिलाची सुनावणी ऑनलाईन करण्यात आली. यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या वकीलांना आहे त्याच ठिकाणाहून अपिल सुनावणीला उपस्थित राहता आले. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अपिल सुनावणीसाठी येण्याचा त्रास वाचला आहे.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे आई वडील व ज्येष्ठ नागरिकांचा चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियमाच्या कलम 16 नुसार उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाविरूद्ध दोन अपिल करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या वकीलांच्या सोयीसाठी सदर अपिल सुनावणी ऑनलाईन घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला. याबाबत अर्जदार आणि त्यांच्या वकीलांना कळविण्यात आले. दरम्यान आज महसूल भवनात गुगल मिटच्या सहाय्याने ऑनलाईन सुनावणी घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसिलदार प्रशांत पडघन यांच्यासह वकील आणि अर्जदार ऑनलाईन उपस्थित होते.

आज झालेल्या सुनावणीत हरिदास वर्धे विरूद्ध नाना वर्धे आणि हर्षल यावले विरूद्ध वच्छलाबाई यावले या दोन अपिल सुनावणीमध्ये बक्षीसपत्र करून देण्याबाबत वाद सुनावणीसाठी घेण्यात आले. यात दोन्ही पक्षांना ऑनलाईन म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून पुढील आठवड्यात अंतिम सुनावणी ठेवण्याची सुचना केली. तसेच वकीलांना प्रत्यक्षात कागदपत्रे सदर करण्यासाठी निर्देशित करण्यात आले.

आजच्या सुनावणीमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून बक्षीसपत्र करून घेण्यात आले. मात्र बक्षीसपत्रात नमूद अटी शर्तीचे पालन होत नसल्याने याबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अधिनियमानुसार अर्ज सादर करण्यात आला. उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरूद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल अर्ज सादर करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांचे वय अधिक असल्याने जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी अपिल सुनावणी ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन्ही पक्ष आणि वकीलांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार आज विनाव्यत्यय अपिल सुनावणी घेण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या ऑनलाईन सुनावणीच्या निर्णयाचे दोन्ही पक्ष आणि वकीलांना स्वागत केले.