भावी डॉक्टरवर काळाचा घाला

भावी डॉक्टरवर काळाचा घाला

■ अमरावतीच्या 'यश'चा तिरुअनंतपुरम येथे चारचाकी अपघातात मृत्यू,

■ आईसह अन्य तीन गंभीर जखमी
आज पार्थिव पोहचणार अमरावतीत,सर्वत्र हळहळ

अमरावती / प्रतिनिधी


       वैद्यकीय क्षेत्रात आपले भविष्य घडविण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या यश रवींद्र नाईक या होतकरू तरुणाचा काळाने अक्षरशः घात केला. केरळमधील एम.व्ही.आर मेडिकल कॉलेज, कन्नूर येथे एमबीबीएससाठी प्रवेश निश्चित करून अमरावतीच्या दिशेने  परत येत असताना, तिरुअनंतपूरम जवळ शुक्रवारी (दि.२७) पहाटे पाच वाजताच्या  सुमारास झालेल्या भीषण अपघातात यशचे दुर्दैवी निधन झाले. त्याच्या निधनाने संपूर्ण अमरावती शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
   यश नाईक (वय १९) संजय गांधी नगर अमरावती  हा रविंद्र नाईक आणि मनिषा नाईक यांचा एकुलता एक मुलगा होता. वैद्यकीय प्रवेश घेण्यासाठी तो केरळला गेला होता. स्वप्नांच्या दिशेने पहिले पाऊल टाकून तो परत येत असताना, शुक्रवारी तिरुअनंतपूरम जवळ त्यांच्या चारचाकी क्र. एम.एच.२७,डी.एल.६७१६ या वाहनाचा अपघात झाला. यात यशचा जागीच मृत्यू झाला.या अपघातात त्याच्यासोबत असलेले मामा संदीप सुभाष जामनीक आणि मावसे संदीप रामदास भटकर (दोघेही रा.दर्यापूर ) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर बंगलोर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनिषा नाईक या सुदैवाने स्थिर असून त्यांच्यासह इतर दोन जण सुद्धा या अपघातात जखमी झाले होते.
    यशचा मृतदेह तिरुअनंतपुरम येथून अमरावतीकडे रवाना झाला असून त्याची अंत्ययात्रा आज २९ जून रोजी सकाळी ११ वाजता  संजय गांधी नगर  येथील निवासस्थानावरून निघणार आहे.लहानपणापासून डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचे त्याचे स्वप्न पूर्णत्वास येत होते. सामान्य परिस्थितीतही यश ने जिद्द आणि ध्येय कायम ठेवत एमबीबीएसला प्रवेश निश्चित केला होता.डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्णत्वास येत असतांना अचानक या तरुण भावी डॉक्टरवर काळाने घाला घातला.या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे तर नाईक कुटुंबावर शोककळा पसरली आहे.