शीला तायडे यांचे जीवन समर्पणाचे प्रतीक – खा. बळवंत वानखडे
■ आरोग्य विभागासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
परतवाडा/प्रतिनिधी:
आरोग्य विभागात आपल्या निःस्वार्थ, समर्पित सेवेने उज्वल कारकीर्द घडविणाऱ्या श्रीमती शीला राजेंद्र तायडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कृतज्ञता समारंभात खासदार बळवंत वानखडे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना, “शीला तायडे यांचे जीवन हे खऱ्या अर्थाने समर्पणाचे प्रतीक आहे,” अशा शब्दांत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.शिला राजेंद्र तायडे यांनी आपल्या कुटुंबावर जे संस्कार केले त्यामुळेच आज त्यांच्या कुटुंबाने हा अभिमानास्पद क्षण अनुभवायला दिला आहे आणि ही दुर्मिळ बाब असल्याचे देखील ते म्हणाले.
परतवाडा येथील वाघामाता परिसरातील प्रा. राम शेवाळकर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात खा.बळवंत वानखडे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, प्रा.आ.केंद्र पथ्रोट येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गोळे, काँग्रेस कमिटी अचलपूरचे शहराध्यक्ष श्रीकांत झोडपे, अशोक तायडे, तसेच सत्कारमूर्ती श्रीमती शीला तायडे यांच्यासह अनेक मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर अमोल तायडे यांनी प्रस्ताविक करत कार्यक्रमाची भूमिका विषद केली.डॉ. सुरेश असोले यांनी आपल्या मनोगतात म्हटले, की,शीला तायडे या आमच्या विभागातील केवळ सहकारी नव्हत्या, तर त्या एक कर्तव्यदक्ष, निष्ठावान आणि सेवाभावी विचारांच्या व्यक्ती होत्या. त्यांनी शिस्त, सहकार्य आणि समर्पण याचा आदर्श उभा केला. त्यांच्या शांत, संयमी आणि जबाबदारीने केलेल्या कामामुळेच विभागाला खऱ्या अर्थाने बळकटी मिळाली.” त्यांनी शीला तायडे यांना आरोग्यपूर्ण व निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन शीला तायडे यांचा उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन ज्येष्ठ पत्रकार संजय बनारसे यांनी केले. सत्काराला उत्तर देताना शीला तायडे भावुक होत म्हणाल्या, की,“हा सत्कार आणि व्यक्त झालेली भावना माझ्या आयुष्याची शिदोरी ठरेल. हा गौरव केवळ माझा नाही, तर माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या सहकाऱ्यांचाही आहे.”यावेळी डॉ. सचिन गोळे, अशोक तायडे, अमोल तायडे, श्वेता तायडे, आदित्य तायडे, दीपिका तायडे, शारदा तायडे यांनीही मनोगत व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली व निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन मंगेश तायडे यांनी केले. या भावपूर्ण सोहळ्यास कुटुंबातील सदस्य, आरोग्य विभागातील सहकारी, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.