शाळेचे छत गळके,वर्गखोल्यांमध्ये खड्डे,मैदानात दगड

शाळेचे छत गळके,वर्गखोल्यांमध्ये खड्डे,मैदानात दगड

नांदगावपेठ शाळेचा गलथान कारभार!
विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

 

नांदगावपेठ/प्रतिनिधी

    शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांचे हित या सर्व बाबींना ठेंगा दाखवणाऱ्या जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नांदगावपेठ येथील शाळेच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वर्गखोल्यांना गळती लागलेली असून, जमिनीवर खड्डे पडलेले आहेत. शासनाच्या क्रीडा धोरणानुसार स्वतंत्र खेळाचे मैदान आखण्याचे शासनाचे निर्देश असतानाही, या शाळेत कोणतेही मैदान आखण्यात आलेले नाही. उलट, मैदानात मोठमोठे दगड असलेला मुरूम टाकल्याने विद्यार्थी जखमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
   शाळेतील स्वच्छतेकडे कोणतेही लक्ष नाही. लाखो रुपयांचे वेतन घेणाऱ्या शिक्षकांकडून शाळेच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन हटवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत “विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ही स्थिती अत्यंत लाजिरवाणी आहे,” असे सांगितले.विशेष म्हणजे, मागील १७ महिन्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी  मोहपात्रा यांनी दोन वेळा शाळेला भेट देऊन आवश्यक निधी मंजूर केला होता. मात्र, या निधीचा योग्य वापर न होता त्याचा दुरुपयोग झाल्याचा आरोप नितीन हटवार यांनी केला आहे.
   वर्षभरापासून शाळेत सोलर पॉवरचे काम प्रलंबित आहे, विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत आहे, याला मुख्याध्यापकांचे दुर्लक्ष जबाबदार असल्याचा आरोप पालकवर्गातून होत आहे.शाळेच्या देखभाल व दुरुस्ती अंतर्गत बांधकाम विभागामार्फत प्राप्त झालेल्या तीन लाख रुपयांपैकी वर्गखोल्यांची दुरुस्ती न करता, प्राचार्यांनी संपूर्ण निधी मैदानात मुरूम टाकण्यासाठी वापरल्याचे समोर आले आहे. त्यात मोठे दगड असल्याने खेळण्याऐवजी तो परिसर अपघातासाठी कारणीभूत ठरत आहे.
सव्वा तीन लाखांचा निधी, पण वर्गखोल्या अजूनही धोकादायक
शाळेच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने तीन लाखांचा निधी मंजूर केला, परंतु वर्गखोल्यांमध्ये काहीही सुधारणा न करता प्राचार्यांनी संपूर्ण निधी मैदानात मुरूम टाकण्यासाठी वापरला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर कुठल्याही प्रकारचा विचार केला गेला नाही. हा निधी नेमका कुठे गेला, हे तपासण्याची मागणी माजी जि. प. सदस्य नितीन हटवार यांनी  केली आहे.