लाच देणारा पोलीस, घेणारा पोलीस, पळणारा पोलीस, पकडणारा पोलीस, घडलेला प्रकार पाहून सर्वच चक्रावले
धाराशिव -
धाराशिव शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. इथं पोलिसांनीच पोलिसाचा सिनेस्टाईल पाठलाग करून एका गुन्ह्यात अटक केली. आरोपी पोलीस पळून जाताना आणि त्याला पकडतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भररस्त्यात पोलीसच पोलिसाचा पाठलाग करत असल्याने धाराशिवच्या रस्त्यावर बुधवारी अभूतपूर्व चित्र बघायला मिळालं. या घटनेत लाच देणारा पोलीस, लाच घेणारा पोलीस, पकडणारा पोलीस, पळवून लावणारा पोलीस असा विचित्र प्रकार बघायला मिळाला आहे.
मारुती शेळके असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीसाचं नाव आहे. तो पोलीस निरीक्षक पदावर काम करतो. घटनेच्या दिवशी बुधवारी त्याला एका महिला सहकाऱ्यासह लाचखोरी प्रकरणात एसीबीने रंगेहात पकडलं होतं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी शेळकेला एसीबी कार्यालयात आणलं असता, त्याने कार्यालयातून धूम ठोकली. यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अलीकडेच धाराशीवमध्ये एक आत्महत्येचं प्रकरण उघडकीस आलं होतं. या आत्महत्येप्रकरणी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचं नाव समोर आलं. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. या प्रकरणातून मुलाला वाचवण्यासाठी आरोपी पोलीस निरीक्षक मारुती शेळके याने आरोपी मुलाच्या आईकडे म्हणजेच महिला पोलिसाकडे दोन लाखांची लाच मागितली. दोघांमध्ये वाटाघाटी घडून आरोपीच्या आईनं एक लाख रुपये देण्याचं कबूल केलं.
हीच लाच घेण्यासाठी आरोपी शेळके, त्याची महिला सहकारी मुक्ता लोखंडे हिला घेऊन गेला होता. दोघांनी आरोपी मुलाच्या आईकडून ९५ हजार रुपये स्विकारले. यावेळी सापळा रचलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी पीआय शेळके आणि पोलीस अंमलदार मुक्ता लोखंडे यांना रंगेहात पकडलं. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यासाठी त्याना पोलीस ठाण्यात आणलं. गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू असताना आरोपी पीआय शेळके एसीबीच्या कार्यालयातून पळाला.
याची माहिती मिळताच एसीबीच्या पोलिसांनी त्याचा सिनेस्टाइल पाठलाग केला. धाराशिव शहरातील लेडीज क्लब समोरील रस्त्यावरून त्याची उचलबांगडी केली. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. शेळकेला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा एसीबीच्या कार्यालयात आणलं. महिला अमलदार मुक्ता लोखंडे हिच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7, 7(अ) अन्वये, तर पोलीस निरीक्षक मारुती शेळके याच्याविरोधात कलम 12 अन्वये आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एसीबीच्या पोलिसांनी केलेल्या सुरक्षेत केलेल्या चुकीमुळे शेळके पळाला, त्यामुळे आता एसीबीच्या पोलिसांवर देखील संशय व्यक्त केला जातोय. पोलिसांच्या मदतीनेच पीआय शेळके पळून गेल्याचं सांगितलं जातंय. यामुळे सुरक्षेत चूक केल्याप्रकरणी एसीबीच्या पोलिसांवर देखील काय कारवाई होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लाच देणारा पोलीस, घेणारा पोलीस, त्याला पकडणारा पोलीस, पळून जाणारा पोलीस, पळवणारा पोलीस, असा विचित्र प्रकार धाराशिवमध्ये उघडकीस आला आहे.