नक्षलग्रस्त भागात योगाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या मेघा ठाकरे यांचा 'योगरत्न' पुरस्काराने गौरव

नक्षलग्रस्त भागात योगाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या मेघा ठाकरे यांचा 'योगरत्न' पुरस्काराने गौरव

नांदगाव पेठ -
   नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग असलेल्या गोंदिया जिल्ह्यात गेली १२ वर्षे निरंतरपणे निशुल्क योग विद्येचा प्रसार करणाऱ्या, ग्रामीण जीवनात योगाची ज्योत पेटवणाऱ्या अमरावती येथील सुप्रसिद्ध योग निसर्गोपचार व आहार तज्ञ मेघा लक्ष्मण ठाकरे यांना नुकतेच 'योगरत्न पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, ए.जी.एम.ए, व  आयुष विभाग यांच्या वतीने  छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित विशेष समारंभात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
       या पुरस्कार वितरण सोहळ्याला डॉ.बाळासाहेब पवार हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ.नितीन राजे पाटील आदी मान्यवर मंडळी विचारपीठावर उपस्थित होते.मेघा ठाकरे यांनी गोंदिया जिल्ह्यातील अनेक आदिवासी व मागास भागांमध्ये जाऊन ३६० पेक्षा अधिक मोफत योग शिबिरे आयोजित केली. केवळ योगाभ्यासच नव्हे तर वृक्षारोपण, जनजागृती रॅली, शालेय योग शिबिरे व बालसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे.गेल्या चार वर्षांपासून त्यांनी अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातही योगप्रसाराचे कार्य हाती घेतले असून, त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन 'योगरत्न' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.
   समाजात आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि नैतिक मूल्यांची जागृती घडविणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वांचा सन्मान हा संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत असतो. योगसाधना आणि सामाजिक बांधिलकी यांची अभूतपूर्व सांगड घालणाऱ्या मेघा ठाकरे यांचे कार्य हे इतरांसाठीही मार्गदर्शक ठरत असून त्यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्कारामुळे जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.