कार्यालयीन कामकाज करीत असताना नागरिकांशी चागंले वागा - परिवहन आयुक्त विवेक भीमनवार
■ कार्यालयीन कामकाज करीत असताना असभ्य उद्धट भाषा, उद्धट वर्तन न करता सौजन्यपूर्वक संवाद साधा अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होणार
■ दलाला मार्फत वाहन फिटनेस प्रमाणत्र मिळवण्यासाठी गाडी न पाठवता स्वता नेल्यामुळे एका सामाजिक संस्थेची गाडी महिला आरटीओ यांनी केली होती रिजेक्ट
■ अमरावती प्रादेशिक परिवहन विभागातील गैर कारभाराची करण्यात आली होती. ऑनलाईन ईमेलव्दारा परिवहन आयुक्त मुंबई यांच्या कडे तक्रार
मुंबई -
मोटार वाहन विभागामार्फत मोटार वाहन अधिनियम, १९८८ व त्याअंतर्गत नियमांनुसार विविध वैधानिक सेवा नागरिकांना देण्यात येतात. यामध्ये वाहन चालक अनुज्ञप्ती जारी करणे, वाहन तपासणी करणे, परवाने जारी करणे, कर संकलन करणे, दोषी वाहनांवर कार्यवाही करणे व इतर कार्यवाही यांचा समावेश होतो. सदर सेवांचे स्वरुप नागरिकाभिमुख असल्याने, कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर्तनाचा व कार्यपध्दतीचा नागरिकांवर थेट प्रभाव पडत असतो.
या बाबत निदर्शनास आले होते की, काही परिवहन कार्यालयांमध्ये नागरिकांशी संवाद साधताना असभ्य भाषा, उद्धट वर्तन किंवा विलंब प्रक्रियेमुळे अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा प्रकारचे वर्तन हे सेवाभावाशी विसंगत आहे. तसेच परिवहन विभागाच्या प्रतिमेसही बाधा पोहचविणारे आहे. शासनाच्या वतीने नागरीकांना पारदर्शक तत्पर सुसंवादात्मक सेवा देण्याचे उद्दीष्ट असून त्यानुसार शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आचरणामध्ये सौजन्य, शिस्त, विनयशिलता व नैतिकता राखणे अपेक्षित आहे.
राज्यातील मोटार वाहन विभागाच्या सर्व कार्यालयांतील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाला एतद्वारे आदेशित करण्यात येते की, त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांमधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे, मोटार वाहन कायदा, १९८८ व त्याअंतर्गत नियमांनुसार कार्यवाही करताना कोणत्याही प्रकारचा पक्षपात, विलंब किंवा टाळाटाळ करण्यात येऊ नये. परिवहन कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी तसेच रस्त्यावर दोषी वाहनांवर कार्यवाही करत असताना वाहनाच्या चालक/मालक यांच्याशी संवाद साधताना असभ्य उद्धट भाषा, उद्धट वर्तन करु न करता सौजन्यपूर्व संवाद साधावा. नागरिकांच्या तक्रारी अथवा अभिप्रायाकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांचे तात्काळ व
नियमानुसार निवारण आपल्या स्तरावरुन करण्यात यावे. कार्यालयीन व्यवहारामध्ये सौजन्य, सुसंवाद, कार्यक्षम सेवा व उत्तरदायित्व या मुल्यांचे पालन करणे बंधनकारक आहे. यासाठी
सर्व क्षेत्रीय कार्यालयप्रमुखांना एका परिपत्रकाद्वारे आदेशित करण्यात आले की, त्यांनी त्यांचे कार्यालयांमध्ये वर नमूद सूचनांचे पालन होत असल्याबाबत दक्षता घ्यावी, तसेच याबाबत त्यांचेस्तरावरुन नियमितपणे आढावा घ्यावा व त्याचा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा.
सदर बाबींचे पालन न करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांविरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) १९७९ अन्वये शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात येईल तसेच संबंधित कार्यालय प्रमुखाविरुध्द त्यांच्या पर्यवेक्षण शैथिल्याबाबत शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल याची सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नोंद घ्यावी.असे आदेश एका परिपत्रकाव्दारे सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालये सर्व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सर्व उप प्रादेशिक परिवहन कार्यालये सर्व नियंत्रक अधिकारी, परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांना परिवहन आयुक्त विवेक भीमनवार)
महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिले आहे.