रस्ते अपघातग्रस्ताला वाचवण्यात देवदूत ठरले धामणगांवकर

रस्ते अपघातग्रस्ताला वाचवण्यात देवदूत ठरले धामणगांवकर

■ १०७ रुग्णवाहिका चालक संतोष वाघमारे,व डॉक्टर यांची माणुसकीचे दर्शन

धामणगाव रेल्वे -

अमरावती शहरा जवळील पोहरा रोडवरील भानखेड फाट्याजवळ सोमवारी रात्री आठच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात साईनगर येथील ५० वर्षीय संतोष शहारे हे गंभीर जखमी झाले. या अपघातात मलकापूरकडे जाणारे एक दाम्पत्य देखील सहभागी होते.

अपघातानंतर संतोष शहारे हे रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. अंधार असल्याने आणि परिस्थिती समजून घेण्यात वेळ जात असल्याने आजूबाजूचे लोक केवळ बघ्याची भूमिका घेत होते.

या वेळी धामणगाव रेल्वे येथून अमरावतीला एका रिसेप्शनसाठी जात असलेले पत्रकार संतोष वाघमारे हे पत्नी आणि मुलीसह त्या ठिकाणी आले. गर्दी पाहून त्यांनी वाहन थांबवले आणि अपघातग्रस्ताची स्थिती पाहून तात्काळ मदतीस धावले. योगायोगाने त्याच वेळी घटनास्थळी अमरावतीकडे जाणारी १०८ रुग्णवाहिका आली. पत्रकारवाघमारे यांनी रुग्णवाहिका थांबवून त्यातील चालक अंकुश डुमरे व डॉक्टर तेजस सोळंके यांना मदतीसाठी विनंती केली. तत्काळ प्रतिसाद देत त्यांनी अपघातग्रस्त संतोष शहारे यांना रुग्णवाहिकेत घेतले आणि अमरावतीतील ईर्विन रुग्णालयात दाखल केले. रिसेप्शनला उशीर होत असूनही कोणतीही ओळख नसताना अपघातग्रस्ताची मदत करून पत्रकार संतोष वाघमारे यांनी माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण दिले.
तसेच, १०८ रुग्णवाहिकेत आधीपासून रुग्ण असतानाही चालक व डॉक्टरांनी दुसऱ्या रुग्णाची मदत करत आपले कर्तव्य पार पाडले. या माणुसकीच्या घटनामुळे धामणगांव रेल्वे परिसरात पत्रकार वाघमारे, चालक अंकुश डुमरे आणि डॉक्टर तेजस सोळंके यांचे जोरदार कौतुक होत आहे. अशा संवेदनशील व तत्पर कृतीमुळे समाजात अजूनही माणुसकी शिल्लक असल्याची जाणीव निर्माण झाली आहे.