शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत
जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
अमरावती-
दि. 23 आजपासून जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शैक्षणिक सत्राला प्रारंभ झाला. विकसित भारत घडविण्यासाठी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असून शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले.
वलगाव येथील पीएमश्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेला जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी आज सकाळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी सरपंच सुधीर उगले, उपसरपंच दशरथ मानकर, तहसिलदार विजय लोखंडे, पोलीस निरीक्षक वैभव पानसरे, मुख्याध्यापक जावेद अहमद, विस्तार अधिकारी अजित पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्चना ठाकरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे सर्वांना खुली केली. त्यांनी मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्यामुळे आज शाळेमध्ये विद्यार्थिनींची संख्या तुलनेत जास्त आहे. आज मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत, याचा आनंद आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मेहनत आवश्यक आहे. शासकीय शाळा खाजगी शाळांपेक्षा कुठेही कमी नाहीत. मी ही शासकीय शाळेचा विद्यार्थी आहे. विद्यार्थ्यांनी वेळेचे महत्त्व जाणून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. बलस्थानावर लक्ष देऊन यश मिळवावे, असे सांगितले.
पालकांनीही मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावे. शैक्षणिक कार्यासाठीच मोबाईलचा उपयोग व्हावा. विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे वय आहे. विद्यार्थ्यांची प्रगतीची जबाबदारी ही शिक्षकांसह पालकांचीही आहे. भविष्यातील सुज्ञ नागरिक तयार करण्याची जबाबदारी शिक्षक आणि पालक या दोघांची असल्याचे जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य संचाचे वाटप करुन त्यांना नवीन शैक्षणिक सत्रासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी देखील आम्ही चांगला अभ्यास करून प्रगती करू, असा मनोनिर्धार यावेळी व्यक्त केला. विद्यार्थी, शिक्षक गण, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते