डीबीटीमुळे अमरावती जिल्ह्यात हजारो लाभार्थ्यांना थेट अनुदान

डीबीटीमुळे अमरावती जिल्ह्यात हजारो लाभार्थ्यांना थेट अनुदान


अमरावती-
दि. 05 - अमरावती जिल्ह्याने शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण ( डीबीटी) योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.

             डिसेंबर 2024 पासून सुरू झालेल्या या प्रक्रियेअंतर्गत, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या हजारो लाभार्थ्यांना थेट त्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यांमध्ये अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. मे 2025 पर्यंतचे अनुदान वितरीत झाले असून, अमरावती जिल्हा डीबीटी पोर्टलवर सर्वाधिक लाभार्थी नोंदणी आणि अनुदान वितरणात राज्यात आघाडीवर आहे.

शासन निर्णयानुसार, जानेवारी 2025 पासून केवळ आधार प्रमाणित लाभार्थ्यांनाच डीबीटी पोर्टलद्वारे अर्थसहाय्य दिले जात आहे.

 सद्यस्थितीत 2 जून 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, संजय गांधी निराधार योजनेचे 87 हजार 073 लाभार्थी डीबीटी पोर्टलवर नोंदणीकृत असून, त्यापैकी 75 हजार 977 आधार प्रमाणित आहेत आणि 62 हजार 400 लाभार्थ्यांना मे महिन्याचे अनुदान प्राप्त झाले आहे. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत 1 लाख 61 हजार 651 लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून, 1 लाख 35 हजार 162 आधार प्रमाणित आहेत आणि 1 लाख 13 हजार 069 लाभार्थ्यांना अनुदान मिळाले आहे.

            जिल्ह्यातील एकूण 2 लाख 48 हजार 724 लाभार्थ्यांपैकी 2 लाख 11 हजार 139 जणांचे आधार प्रमाणीकरण झाले असून, 1 लाख 75 हजार 469 लाभार्थ्यांना अनुदान मिळाले आहे. अनेक लाभार्थ्यांना एकापेक्षा जास्त बँक खाती असल्याने, अनुदान आधार लिंक केलेल्या खात्यात जमा होत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले योजनेचे बँक खाते आधारशी लिंक करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

            ज्या लाभार्थ्यांचे पेमेंट फेल झाले आहे, त्यांनी त्वरित आपल्या बँकेच्या शाखेत आधारकार्डची प्रत जमा करून खाते आधारशी संलग्न करून घ्यावे. तसेच, ज्या लाभार्थ्यांची अद्याप डीबीटी पोर्टलवर नोंदणी झाली नाही किंवा आधार प्रमाणित नाही, त्यांनी अद्ययावत आधार कार्ड आणि बँक पासबुकची प्रत तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागात सादर करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे