श्रीरामचंद्र संस्थान येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा

श्रीरामचंद्र संस्थान येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा

नांदगावपेठ - 

     येथील श्रीरामचंद्र संस्थान येथे जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीरामचंद्र संस्थान येथील परिसरात या योग कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते. या  कार्यक्रमासाठी जनार्दनस्वामी मंडळ, नागपूरचे योगशिक्षक मकरंद जोग, योगसाधिका डॉ. सौ. शितल धनभर आणि डॉ. सौ. प्रतिभा राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.
   प्रभू श्रीरामचंद्र यांच्या श्रीरामपंचायतनाला हारार्पण करून व श्रीराम नाम संकीर्तनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. "चंदन है इस देश की माटी" हे देशभक्तीपर गीत सर्वांनी सुस्वरात गायले. यानंतर श्रीराम सेवाधारींनी पाहुण्यांचे स्वागत शाल, श्रीफळ व प्रसाद देऊन केले.
   संस्थानचे प्रमुख प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांनी योगप्रणालीचे महत्त्व व त्याचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम यावर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात गजानन राणे यांच्या शिवशक्ती क्रीडा अकॅडमी व गणेश युवक मंडळाच्या खेळाडूंनी प्रभावी शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली.
   योगरत्न सौ. मेघा हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला योगसाधिकांनी कठीण योगासने सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या प्रात्यक्षिकांचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले. मकरंद जोग यांनी उपस्थितांना योगासनाचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करत योगाभ्यासाचे महत्त्व सांगितले. सामूहिक आरती, पसायदान व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
    या कार्यक्रमाला सुधीर देशमुख,  काशीराव चांदूरकर, अशोक महल्ले, संदीप अकोलकर, उद्धव पांढरीकर दत्ताभाऊ पांढरीकर, अविनाश शिंदे,संतोष गहरवार, निलेश सरोदे, सार्वजनिक वाचनालयाचे सचिव राजन देशमुख यांच्यासह गावातील नागरिक व योगप्रेमी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्रीरामरायाच्या साक्षीने सर्वांनी नियमित योगाभ्यासाचा संकल्प करून कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली.