त्या दिवशी सोळा वर्षाच्या मुलासमोर बापाने कॅन्सरमुळे शेवटचा श्वास घेतला होता.

त्या दिवशी सोळा वर्षाच्या मुलासमोर बापाने कॅन्सरमुळे शेवटचा श्वास घेतला होता. 
कॅन्सरचे निदान झाल्यापासून उपाचारातील असुविधा, आर्थिक अडचणी ते मुंबईतील टाटा हॉस्पीटलचे हेलपाटे, औषधोपचार हा सर्व प्रवास तो कोवळ्या वयात पाहत होता आणि वडिलांच्या ह्या प्रवासाचा अंत त्याच्या मनात खोलवर परिणाम करून गेला. 
म्हणतात ना  काही क्षण आपलं आयुष्यच बदलून टाकतात. ते केवळ वैयक्तिक दुःख देत नाहीत तर जीवनाला एक नव्याने अर्थ देतात. नुकतेच १७ व्या वर्षात पदार्पण केलेल्या देवेंद्रजींनी मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये आपल्या वडीलांचा मृत्यू हतबलतेने पाणावलेल्या डोळ्यांनी पाहीला होता. यादरम्यान फडणवीस कुटुंबियांना अनेक प्रकारच्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागले. वडिलांवर कॅन्सरचे उपचार सुरू असताना त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती की, नागपूर आणि महाराष्ट्रातील इतर शहरांतील कॅन्सरच्या रुग्णांना उपचारासाठी मुंबईला जाण्याशिवाय पर्यायच उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांनी त्याचवेळी मनोमन नागपूर विदर्भात कॅन्सरवर उपचार करणारे हॉस्पिटल सुरू करण्याचे ठरवले होते.

गंगाधर फडणवीस हे केवळ पत्रकार नव्हते, तर समाजशील, निष्ठावान आणि मूल्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने केवळ एक मुलगा पोरका झाला नाही, तर नागपूरच्या समाजमनानेही एक मार्गदर्शक गमावला. त्यांचे व्यक्तिमत्त्व देवेंद्रजींच्या जीवनावर खोलवर परिणाम करणारे ठरले. परंतु त्यांच्या जीवनातला सर्वात भावनिक क्षण म्हणजे आपल्या वडिलांना कँसर झाल्याचे कळणे आणि काही काळातच त्यांचा या रोगाने घेतलेला बळी. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वडिलांच्या आजारपणाच्या काळात वडीलांच्या शारीरिक आणि मानसीक वेदना अनुभवल्या होत्या तसेच वैद्यकीय व्यवस्थेतील त्रुटींची खोल जाणीव त्यांच्या मनात घर करून राहिली. देवेंद्रजींनी वयाच्या १७ व्या वर्षी ठरवल्यानुसार आजच्या घडीला नागपुरातील जामठा परिसरात ४७० बेडचे अत्याधुनिक नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार केले जात आहेत. धर्मादाय पद्धतीने चालणारे हे देशातील सर्वात मोठे कॅन्सर रुग्णालय ठरत आहे.

गंगाधर फडणवीस यांना कँसरची लक्षणे दिसू लागल्यावर, नागपूरमध्ये योग्य उपचाराच्या सुविधा नसल्याने त्यांना मुंबईला नेण्यात आलं. त्या काळात देवेंद्र फडणवीस वडिलांच्या आजारपणात त्यांच्यासोबत राहिले. त्यांनी आपल्या वडिलांच्या वेदना जवळून पाहिल्या आणि त्या वेदना केवळ शारीरिक नव्हत्या तर त्या व्यवस्थेच्या कमतरतेचंही प्रतीक होत्या. तेव्हाच त्यांनी मनावर घेतलं होतं की, नागपूरसारख्या शहरात एक सर्वसामान्यांसाठी सुसज्ज, अत्याधुनिक आणि परवडणारं कॅन्सर रुग्णालय असायलाच हवं. हा केवळ एक राजकीय संकल्प नव्हता तर हे एका पुत्राचं आपल्या वडिलांना दिलेलं वचन होतं.

वडिलांचं निधन हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. परंतु त्या दुःखाला त्यांनी उर्जा बनवलं. मुख्यमंत्रिपदाच्या काळात, त्यांनी नागपूरमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (NCI) सारख्या भव्य, अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या रुग्णालयासाठी विशेष पुढाकार घेतला. हा प्रकल्प केवळ वैद्यकीय दृष्टिकोनातून नव्हता, तर तो एक भावनिक कर्तव्यही होतं. NCI साठी निधी मिळवणे, जागेचे आरक्षण करणे, शासनाच्या विविध यंत्रणांमधील समन्वय, सर्व काही स्वतः लक्ष घालून त्यांनी केले. प्रकल्पात विलंब होऊ नये म्हणून त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील 'वॉर रूम' चा वापर करून याची प्रगती दर आठवड्याला तपासत होते. .

आज NCI मध्ये हजारो रुग्णांना कमी दरात किमोथेरपी, रेडिएशन, सर्जरी आणि इतर सर्व उपचार मिळतात. केवळ नागपूरच नव्हे, तर छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, आणि आंध्र प्रदेशातूनही रुग्ण येथे येतात. इथे केवळ उपचार नाही, तर मायेची साथ मिळते – कारण ही संस्था एक वेदनेतून जन्मलेली आहे.

एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी नम्रपणे सांगितले होते की, "मी हे माझ्या वडिलांच्या आठवणीसाठी करतोय. जर त्यांच्या वेदना पाहिल्या नसत्या, तर कदाचित मला या गरजेची जाणीवही झाली नसती."
राजकारणामधून समाजकार्य करण्याबाबत खूप जणं बोलतात पण दुःखातून प्रेरणा घेऊन त्याचा प्रत्यक्ष उपयोग समाजासाठी करणं ही खऱ्या नेतृत्वाची ओळख असते. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीचं सोनं केलं एका अशा रुग्णालयाच्या रूपाने जे हजारो जीवांना नवजीवन देतं.

आज नागपूरची नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ही एक संस्था नाही, ती एक श्रद्धांजली आहे – एका पित्याला, आणि त्याचवेळी सलाम एका पुत्राच्या ध्येयवादी वृत्तीला. 

कालच जागतिक पितृदिन झाला आपल्या पित्याला अश्या रितीने आठवणीत ठेवणाऱ्या देवेंद्रजींना आणि असे पुत्ररत्न देशाला दिल्याबद्दल स्वर्गीय गंगाधरराव यांना मानाचा मुजरा.