आजचा दिवस महाराष्ट्र पोलिस दलाच्या शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि सेवेच्या गौरवाचा!

आजचा दिवस महाराष्ट्र पोलिस दलाच्या शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि सेवेच्या गौरवाचा!


दिनांक २६ जून २०२५ रोजी राजभवन, दरबार हॉल येथे महाराष्ट्र पोलिसांच्या “पदक अलंकरण समारंभ” या अत्यंत सन्माननीय आणि वैभवशाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्यभरातून निवड करण्यात आलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यगौरव, निःस्वार्थ सेवेची भावना, शौर्य आणि कर्तव्यप्रेम याबद्दल पदक आणि सन्मानचिन्हांनी सन्मानित करण्यात आले.
या विशेष समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन हे होते. त्यांच्या सन्माननीय उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला एक शासकीय वैभव आणि प्रतिष्ठेचा नवा दर्जा प्राप्त झाला. त्यांच्या भाषणातून पोलिस दलाचे कार्य, त्यांची समर्पित सेवा आणि लोकशाही व्यवस्थेतील महत्वाचे स्थान अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक मा. श्रीमती रश्मीजी शुक्ला यांचीही प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून पोलीस दलाचे खंबीर नेतृत्व, तांत्रिक प्रगती, महिला पोलिसांची भूमिका आणि समाजातील बदलत्या सुरक्षेच्या गरजांविषयी सविस्तर विवेचन केले.

या समारंभात पदकप्राप्त अधिकाऱ्यांचे कुटुंबीय, विविध प्रशासकीय अधिकारी, निमंत्रित नागरिक आणि मिडिया प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरबार हॉलच्या भव्यतेमध्ये सन्मानित अधिकाऱ्यांचे अभिमान, त्यांच्या यशोगाथांचे स्मरण आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर सगळीकडे अनुभवता येत होता.

पोलीस दल हा केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखणारा नाही, तर तो समाजातील शांतता, सुरक्षा आणि विश्वासाचा खंबीर स्तंभ आहे. अशा कार्यक्रमांद्वारे त्यांच्या कार्याला जी मान्यता दिली जाते, ती फक्त पुरस्कारापुरती नसून संपूर्ण समाजाच्या आभाराची आणि प्रेरणेची जाणीव असते.

आजचा हा गौरवशाली सोहळा महाराष्ट्र पोलिस दलाच्या निष्ठेचा, शौर्याचा आणि सेवेच्या प्रति असलेल्या असामान्य समर्पणाचा स्मरणीय आणि प्रेरणादायी क्षण ठरला.