विष प्राशन करून वृद्ध शेतकऱ्याने संपविले जीवन
ब्राह्मणवाडा भगत येथील घटना
जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन पेटलेले असताना, दुसरीकडे अमरावती तालुक्यातील ब्राह्मणवाडा भगत येथील वृद्ध शेतकरी भाऊराव नथुजी गोंडाने (वय ८२) यांनी कर्जाच्या असह्य ओझ्यामुळे विष प्राशन करून आत्महत्या केली.सतत होणारी नापिकी,कर्जाचे वाढते डोंगर यामुळे त्यांनी गुरुवारी सकाळी आपल्या शेतात जाऊन फवारणीसाठी वापरण्यात येणारे विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली.
घटनेची माहिती मिळताच ब्राम्हणवाडा भगत येथील
सरपंच शंतनु निचित तसेच गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून याबाबत माहुली जहागीर पोलिसांना घटनेची माहिती दिली.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केला. सायंकाळी ७ वाजता गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.
एकीकडे गुरुकुंज मोझरी येथे माजी आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे एक वृद्ध शेतकरी कर्जासमोर हतबल होऊन मृत्यूला कवटाळतो हे सरकारच्या असंवेदनशीलतेचं आणि अपयशाचं जिवंत चित्र आहे.या घटनेने कुटुंबावर तसेच गावात शोककळा पसरली आहे.