100 दिवसीय कार्यालयीन सुधारणा मोहिमेत" अमरावती कृषी उपविभागाचा राज्यस्तरीय सन्मानडॉ. पंकज चेडे व त्यांच्या चमूचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

"100 दिवसीय कार्यालयीन सुधारणा मोहिमेत" 
अमरावती कृषी उपविभागाचा राज्यस्तरीय सन्मान
डॉ. पंकज चेडे व त्यांच्या चमूचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव
अमरावती / प्रतिनिधी

      महाराष्ट्र शासनाच्या "100 दिवसीय कार्यालयीन विशेष सुधारणा मोहीमे" अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, अमरावती यांनी उल्लेखनीय कार्य करत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या मोहिमेचा उद्देश शासकीय कार्यपद्धतीत पारदर्शकता, गतिशीलता व नागरिकाभिमुखता निर्माण करणे हा होता.
    या मोहिमेंतर्गत कार्यालयीन तंत्रज्ञान वापर, संकेतस्थळ अद्ययावत करणे, तक्रार निवारण व्यवस्था, नागरिकांसाठी सेवा सुलभता, गुंतवणूक अनुकूलता व कार्यालयीन सुविधा अशा दहा निकषांवर अमरावती कृषी उपविभागाने अतीउत्कृष्ट कामगिरी केली. यामुळे नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा उपलब्ध झाली.याच पार्श्वभूमीवर नियोजन भवन, अमरावती येथे आयोजित गौरव समारंभात महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते डॉ. पंकज चेडे (उपविभागीय कृषी अधिकारी, अमरावती) व त्यांच्या चमूला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
    या सोहळ्याला खा. अनिल बोंडे, आ. संजय खोडके, आ. प्रवीण तायडे, आ. केवलराम काळे, आ. राजेश वानखडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, आयुक्त सौम्या शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर व विवेक जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
    डॉ. पंकज चेडे हे अमरावती उपविभागात कार्यरत असलेल्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांमध्ये असे एकमेव अधिकारी आहेत, ज्यांनी कार्यालयीन सुधारणांच्या बाबतीत वैयक्तिक पुढाकार घेत प्रभावी अंमलबजावणी केली. त्यांच्या सौजन्यशील नेतृत्वाखाली सर्वच कर्मचाऱ्यांनी एकजुटीने काम करत हा मान मिळवला. त्यामुळे कृषी विभागाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.