बोरनदी धरणाजवळील दरोड्यातील सहा आरोपी जेरबंद, नांदगावपेठ पोलिसांची मोठी कामगिरी
चार आरोपी अद्याप फरार, शोध सुरू
मंगेश तायडे / नांदगाव पेठ
गत एक महिनापूर्वी दि.६ जून रोजी बोरनदी धरणावर फिरायला गेलेल्या एका युवकाला आणि त्याच्या मैत्रिणीला अज्ञात दरोडेखोरांनी मारहाण करून त्यांच्याजवळील सोनसाखळी आणि रोकड पळविली होती.याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून या घटनेतील चार आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस यंत्रणेसमोर गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान असतांना पोलिसांनी तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे प्रशंसनीय कामगिरी केली.
फिर्यादी सिद्धांत सतीशराव राऊत (वय २८, सिव्हिल इंजिनीयर, रा. फ्रेजरपुरा अमरावती) हा युवक त्यांच्या मैत्रीणीसह बोरनदी धरण येथे गेले असता, सायंकाळी ७ वाजता घराकडे परत निघतांना तीन दुचाकींवर आलेल्या दहा अनोळखी युवकांनी त्यांना अडवले. त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील ४,५०० रुपये रोख आणि मैत्रीणीच्या गळ्यातील सुमारे ४५,००० रुपये किमतीची दहा ग्रॅम सोनसाखळी जबरदस्तीने लुटण्यात आली होती.याप्रकरणी फिर्यादी सिद्धांतच्या तक्रारीवरून नांदगावपेठ पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(१)(२) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करून गुन्ह्यातील आरोपींची ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले.
पोलीस आयुक्त अरविंद चावरीया, उपायुक्त गणेश शिंदे, आणि सहाय्यक आयुक्त कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे तसेच डीबी पथकाने तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला.अखेर एक महिन्यानंतर पोलिसांना घटनेतील आरोपींचा छडा लागला. यामध्ये आरोपी शारीक खान आबीद खान (वय २२, रा. फातेमा नगर, लालखडी)शेख अयान शेख नसिर (वय २०, रा. लालखडी),मोहम्मद शोएब उर्फ भल्ला मोहम्मद आरिफ (वय १९, रा. यास्मीन नगर),अयान खान आसिफ खान (वय १९, रा. यास्मीन नगर),शेख शरजील उर्फ राज शेख इरफान (वय १९, रा. यास्मीन नगर),शहर व जिल्हा ग्रामीण मधून तडीपार असलेला आरोपी शेख अरबाज शेख मुजीब (वय २२, रा. लालखडी) या सहा आरोपिंना अटक करण्यात आली.तपासादरम्यान या सर्वांनी गुन्ह्याची कबुली दिली असून या गुन्ह्यातील अन्य चार आरोपी अद्याप फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे.
सदर कारवाईमध्ये ठाणेदार दहातोंडे यांच्यासह पोउपनि वाणी, वाकडे, पोहेकाँ राजा राऊत, पोशि राजीक खान, निलेश साविकार, वैभव तिखीले, राजा सय्यद, संजय नेहारे, चालक पोका वैभव धुरंदर यांनी परिश्रम घेतले.पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईने गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली असून बोरनदी परिसरात मॉर्निंग,इविनिंग वॉक करणाऱ्या नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे तसेच करवाईमधील पोलीस कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.