आरोग्य सेविका अर्चना ढोले, तिचा पती व मुलांविरोधात नांदगाव पेठ पोलिसांत तक्रार

आरोग्य सेविका अर्चना ढोले, तिचा पती व मुलांविरोधात नांदगाव पेठ पोलिसांत तक्रार
आरोग्य उपकेंद्रात दहशत निर्माण करणारे गुंड मोकाट

नांदगाव पेठ / प्रतिनिधी

      येथील अठरा महिन्याच्या बाळावर चुकीचे लसीकरण केल्यामुळे बाळाच्या मांडीला गंभीर इजा होऊन त्याठिकाणी गाठ निर्माण झाल्याने आरोग्य सेविकेला जाब विचारणाऱ्या पालकावर आरोग्य सेविकेच्या पतीने व दोन मुलांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पालक किशोर तायडे यांनी नांदगाव पेठ पोलिसांत रीतसर तक्रार केली असून आरोग्य सेविका अर्चना ढोले, तिचा गुंड प्रवृत्तीचा पती व दोन मुलांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी किशोर तायडे यांनी केली आहे.
      किशोर तायडे यांच्या अठरा महिन्याच्या बाळावर आरोग्य सेविका अर्चना ढोले यांनी चुकीच्या पद्धतीने लसीकरण केल्यामुळे त्या बाळाच्या पायाला मोठी गाठ निर्माण झाली असून खासगी डॉक्टरांनी त्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे.एवढेच नव्हे तर भविष्यात या चुकीच्या लसीकरणामुळे बाळाला अपंगत्व येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही मात्र त्या पालकांचे समाधान करण्याऐवजी आरोग्य सेविका आणि त्यांचे गुंड प्रवृत्तीचे पती व दोन मुले चक्क पालकांच्या अंगावर हात घालून त्यांना मारहाण करतात आणि जीवे मारण्याची धमकी सुद्धा देतात हे पालकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे.
     या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने आरोग्य केंद्रातील एका आरोग्य सेविकेला हात पकडला तीला ढकलले आणि अश्लील शिवीगाळ सुद्धा केली.कायद्याच्या दृष्टीने हा महिलेचा विनयभंग असून शासकीय कामात अडथळा निर्माण करणारा देखील हा गुन्हा आहे मात्र अद्यापही पोलिसांनी सदर प्रकरण चौकशीत ठेवले असून गुंड प्रवृत्तीचे बापलेक आरोग्य उपकेंद्रात दहशत निर्माण करण्यास कोणतीच कसर सोडत नाही हे विशेष! या प्रकारामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र माहुली जहागीर, आरोग्य उपकेंद्र नांदगाव पेठ येथील कर्मचारी, अधिकारी वर्ग मानसिक तणावात असून रुग्ण देखील येथील सेवा घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे.
     दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. "चुकीचे लसीकरण म्हणजे एका बालकाच्या आरोग्याशी आणि भविष्यासोबत केलेला धोका आहे. त्यानंतर तक्रार करणाऱ्या व्यक्तीला धमकावणे ही गंभीर बाब असून पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ आणि ठोस कारवाई करावी," अशी मागणी त्या बालकाचे पालक व गावकरी करीत आहे.याबाबत नांदगाव पेठ येथील नागरिकांनी सुद्धा जिल्हा आरोग्य अधिकारी यांना तक्रार दिली असून आरोग्य सेविका अर्चना ढोले यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी करण्यात आली आहे.