मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त १०१ पिशव्या रक्तसंकलन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त १०१ पिशव्या रक्तसंकलन 
भाजप अमरावती तालुक्याच्या वतीने माहुली जहागीर येथे रक्तदान शिबिर


नांदगाव पेठ / प्रतिनिधी

     राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी अमरावती तालुका शाखेच्या वतीने माहुली जहागीर येथील महालक्ष्मी गोट फार्म येथे मंगळवारी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत, आरोग्य विषयक उपक्रमातून विधायक उपक्रम भाजपच्या माध्यमातून राबविण्यात आला.
    या रक्तदान शिबिरात १०१ पिशव्यांचे रक्त संकलन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन भाजप नेते विवेक गुल्हाने यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते.या प्रसंगी आ. राजेश वानखडे, भाजप अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, तालुकाध्यक्ष विरेंद्र लंगडे, माजी जिल्हा परिषद सदस्या भारती नरेश गेडाम, माजी महिला तालुकाध्यक्ष मोनीका पिहुलकर, माहुली जहागीर येथील सरपंच प्रीती बुंदीले, किसान मोर्चा माजी अध्यक्ष मनोज यावले यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
   कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे विशेष अभिनंदन करताना अशा सामाजिक उपक्रमांमधूनच पक्षाचे जनसामान्यांशी असलेले नाते दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. हे दान कोणाचाही जीव वाचवू शकते, त्यामुळे युवकांनी पुढे येऊन नियमित रक्तदान करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विवेक गुल्हाने व त्यांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.