असदपूरमध्ये जुन्या वाद विवादातून निष्पाप कुत्र्यावर कुर हल्ला

असदपूरमध्ये जुन्या वाद विवादातून निष्पाप कुत्र्यावर कुर हल्ला

अचलपुर - 7 जुलै 2025

अमरावती जिल्ह्यात येणारे अचलपूर तालुक्यातील असदपूर या गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जुन्या वाद विवादातुन बेजुबान पाळीव  प्राणी कुत्र्यावर लोखंडी पाइप आणि कुर्हाडीने क्रूर हल्ला करण्यात आला. ही धक्कादायक घटना असदपूर गावातील असून, या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, सविस्तर वृत्त असे की, असदपूर येथील रहिवासी गोकुळ पाठक यांचा गावातीलच धन आणि घावट या दोन व्यक्तींशी जुना वाद सुरू होता. 6 जुलै रोजी पाठक हे आपल्या शेतामध्ये काम करत असताना त्यांना फोनवरून कळविण्यात आले की त्यांच्या 'बावड्या' नावाच्या पाळीव कुर्त्यावर कुर्हाडीने व लोखंडी पाइपने हल्ला करण्यात आला आहे. गोकुळ पाठक हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी पाहिले की त्यांचा कुत्रा गंभीर जखमी अवस्थेत तडफडत होता. त्याच्या मानेला, पोटाला

व डोळ्याजवळ खोल जखमा झालेल्या होत्या. बावड्या मरणासन्न अवस्थेत आपल्या मालकाकडे पाहत होता, हे दृश्य पाहून गोकुळ पाठक यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

घटनेची माहिती मिळताच प्राणिमित्र उषा पानसरे यांनी त्वरीत पशुवैद्यकांना बोलावून उपचार सुरू केले. याचबरोबर त्यांनी असदपूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. बिट जमादार श्री. घोडकर यांनी घटनास्थळी भेट दिली व संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत गोकुळ पाठक यांची फिर्याद नोंदवून घेतली.

गोकुळ पाठक यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे

माझ्या घरी नसताना धन आणि घावट यांनी वैरातून माझ्या बावड्या नावाच्या पाळीव कुर्त्यावर कुर्हाडीने आणि लोखंडी पाइपने हल्ला केला. त्याच्या मानेला, पोटाला व डोळ्याजवळ गंभीर जखमा झाल्या आहेत. जेव्हा मी तिथे पोहोचलो, तेव्हा तो मरणासन्न अवस्थेत मला बघत होता. या घटनेविषयी मी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून, संबंधित दोन्ही क्रूरकर्मयांवर कठोर कारवाई करण्यात यावी.