अमरावतीत एकवटणार तीन राज्यातील तेली समाज उद्योजक
अमरावती (प्रतिनिधी)
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर कैलास छाया चॅरिटेबल ट्रस्ट अमरावतीच्या वतीने येत्या रविवार दिनांक 19 जुलै रोजी अंबानगरी अमरावतीत राज्यस्तरीय तेली समाज उद्योजक मेळावा व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या उद्योजक मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गोवा या तीन राज्यातील उद्योजक एकवटणार आहे.
कैलास छाया चॅरिटेबल ट्रस्ट, यश असोसिएट्स, आसरा रेस्टॉरंट व सावली महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित या राज्यस्तरीय मेळाव्याचे उद्घाटन रविवार दिनांक 19 रोजी सकाळी 10 वाजता तेली समाजाचे नेते व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. कैलास छाया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व तेली समाजातील प्रसिद्ध उद्योजक कैलास गिरोळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळव्यास महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार रामदास तडस, माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून तेली समाजातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.
राज्यातील तसेच बाहेरील राज्यातील तेली समाजातील उद्योजक एकाच व्यासपीठावर येऊन समाजाला दिशा मिळावी तसेच त्यांच्यात चर्चा होऊन विचारांचे आदान प्रदान व्हावे आणि विविध उद्योगांना वाव मिळावा सोबतच तेली समाजातील गुणवंतांचा यथायोग्य सन्मान होऊन येणाऱ्या पिढी समोर आदर्श निर्माण व्हावा या उदात्त हेतूने या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले. अंबानगरी अमरावतीत प्रथमच आयोजित या अभिनव मेळाव्यास समस्त तेली समाज बांधवांनी व उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक मयूर जीरापुरे, छाया कैलास गिरोळकर व तेली समाज हितकारक मंडळांने केले आहे.
सुशील आगरकर यांचे व्याख्यान
उद्योजक मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या तेली समाजातील उद्योजकांना मुंबई येथील चेज कंपनीचे संचालक व मोटिवेशनल स्पीकर सुशील आगरकर हे आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे. स्थानिक बाजारातील रणनीती, संभाव्य ग्राहक, नेटवर्किंग, स्टार्टअप व्यवसायाला लागणारा निधी, जागतिक घडामोडींचा स्थानिक मार्केटवर होणारा परिणाम अशा विविध विषयांवर सुशील आगरकर हे मार्गदर्शन करून उद्योजकांसोबत संवाद साधणार आहे तसेच तेली समाजातील उद्योजकांना ते एक वर्ष मोफत मार्गदर्शन व समुपदेशन करणार आहेत.
समाज भूषण गुणवंतांचा होणार सत्कार
इयत्ता दहावी व बारावीमध्ये गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त करून नावलौकिक प्राप्त करून तेली समाजाचे भूषण ठरणाऱ्या गुणवंतांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार असून आतापर्यंत 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या नावाची नोंदणी झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
तेली समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न : कैलास गिरोळकर
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा आणि छत्तीसगड आधी राज्यात तेली समाजाचे मोठ्या प्रमाणावर प्राबल्य असून ह्या समाजातील उद्योजकांना एकत्र करून व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना संघटित करण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राज्यात प्रथमच आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यासाठी आतापर्यंत तीन राज्यातील 1200 उद्योजकांची नोंदणी झाली असल्याची माहिती कैलास गिरोळकर यांनी दिली. या मेळाव्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील दिल्ली समाजातील उद्योजकांची ओळख व्हावी ते एकत्र यावे उद्योग क्षेत्रात पुढे येणाऱ्यांना मार्गदर्शन मिळावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून अशा प्रकारचा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येणार आहे. या पहिल्या उद्योजक मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी स्थानिक तेली समाज बांधव परिश्रम घेत असल्याचे गिरोळकर यांनी सांगितले.