सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक अधिकारी पॅनेल जाहीर
अमरावती -
विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांनी 'ई' वर्गातील सहकारी गृहनिर्माण संस्था, म्हणजेच ज्या संस्थांमध्ये 250 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी सदस्य आहेत, त्यांच्या आगामी निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे पॅनेल तयार करण्यात येणार आहे. यासाठी पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहकार संकुल, कांता नगर, अमरावती येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयामार्फत कळविण्यात आले की, निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलमध्ये समाविष्ट होण्यासाठी शासकीय विभागातील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील कार्यरत अधिकारी-कर्मचारी, वरिष्ठ लिपिक किंवा त्याहून अधिक दर्जाचे कर्मचारी, प्रमाणित लेखापरीक्षक, वकील तसेच शासकीय किंवा निमशासकीय संस्थेतून निवृत्त झालेले अधिकारी-कर्मचारी (ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त नाही) अर्ज करू शकतात.
या पॅनेलसाठी आवश्यक असलेले विहित नमुन्यातील अर्ज येत्या 21 जुलै 2025 पासून ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत उपलब्ध असतील. हे अर्ज शासकीय सुट्ट्या वगळून, कार्यालयीन वेळेत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांच्या कार्यालयात (सहकार संकुल, कांता नगर) मिळवता येतील. कार्यालयाच्या जाहीर नोटीस बोर्डवरही अर्जाचा नमुना प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, शंकर कुंभार यांनी अर्जदारांना आवाहन केले आहे की, आपले अर्ज 21 ऑगस्ट 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत संबंधित कार्यालयात सादर करावेत. यामुळे 'ई' वर्गातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका वेळेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यास मदत होईल.