शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन
अमरावती -
 जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागास वर्ग आणि आर्थिक मागास प्रवर्गातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या वसतिगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा मोफत पुरविण्यात येतात. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता 8 वी ते 10 वी (शालेय), कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी  https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी अभ्यासक्रमात शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर, तो पोर्टलवरून डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून संबंधित वसतिगृहात ऑफलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अमरावती जिल्ह्यातील वसतिगृहे अमरावती स्थानिक वसतिगृहांमध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन प्रवेशासाठी पुढील वसतिगृहे उपलब्ध आहेत.

मुलांसाठी (विभागीय स्तरावर )शासकीय वसतिगृह युनिट क्र. 1, 2, 3 निंभोरा, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, निंभोरा, संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, निंभोरा तसेचमुलींसाठी (विभागीय स्तरावर) मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, कॅम्प, अमरावती, गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह, जेल रोड, अमरावती, विभागीय स्तरावरील 250 मुलींचे युनिट क्र. 4, अमरावती, 125 जयंती मागासवर्गीय मुलींचे (नवीन) वसतिगृह, विलास नगर, अमरावती ही वसतिगृहे उपलब्ध आहेत.

याशिवाय, तालुका स्तरावरील मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये इयत्ता 8 वी ते 10 वी (शालेय), कनिष्ठ व वरिष्ठ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृहांकडे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0721-2661261 वर संपर्क साधण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.