प्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकारी नसल्याने वाहनधारक त्रस्त, दलालराज बोकाळला !
■ भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे जिल्हाध्यक्ष राजू चिरडे यांची तीव्र प्रतिक्रिया
अमरावती / प्रतिनिधी
प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावती येथे कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे वाहनमालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे जिल्हाध्यक्ष राजू चिरडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, कायमस्वरूपी अधिकारी नेमून दलालराज संपुष्टात आणावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.
सध्या दुसऱ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आंतरजिल्हा नियुक्ती या कार्यालयात करण्यात आली आहे. हे अधिकारी केवळ आठवड्यात दोन दिवस अमरावती कार्यालयामध्ये उपस्थित राहतात आणि उर्वरित काळात आपल्या मूळ जिल्ह्यात परत जातात. त्यामुळे दोन दिवसांमध्ये मर्यादित वाहनच तपासले जातात, तर उर्वरित वाहनधारकांना पुढील आठवड्याची वाट पाहावी लागते.
यामुळे दलाल मंडळी सक्रिय होत असून, वाहनधारकांना “कमिशन”च्या बदल्यात लवकर पासिंग करून देण्याचे आमिष दाखवले जाते, असा गंभीर आरोप राजू चिरडे यांनी केला आहे. "कमिशन दिल्यास वाहन लगेच पासिंग होते, नाहीतर आठवडाभर थांबा" अशी परिस्थिती असून, हा प्रकार सर्वसामान्य वाहनधारकांसाठी अन्यायकारक आहे, असे ते म्हणाले.
“या कार्यालयात पूर्णवेळ अधिकारी नेमला गेला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. दलालांचा सुळसुळाट थांबवण्यासाठी ठोस पावले उचलावी लागतील.अमरावती कार्यालयात सध्या सुरू असलेली ही परिस्थिती वाहनधारकांच्या संयमाचा अंत पाहणारी ठरत असून विभागाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी राजू चिरडे यांनी केली आहे.