दारापुर येथे साकारणार माजी राज्यपाल स्मृतीशेष रा.सु. उपाख्य दादासाहेब गवई स्मृती प्रवेशद्वार

दारापुर येथे साकारणार  माजी राज्यपाल स्मृतीशेष  रा.सु. उपाख्य दादासाहेब गवई स्मृती प्रवेशद्वार
देशाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्या हस्ते प्रवेशद्वार स्थळाचे भूमिपूजन

आ.सौ. सुलभाताई खोडके,आ. संजय खोडके ,डॉ.राजेंद्र गवई यांची उपस्थिती

अमरावती(प्रतिनिधी)
दिनांक- २५ जुलै   दिवंगत नेता माजी राज्यपाल रा.सु. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या  मौजे दारापुर  या जन्मस्थळी स्मृतीप्रवेशद्वार  साकारण्याचा मानस  आ.सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केला आहे. आज शुक्रवार दिनांक २५ जुलै रोजी स्मृतीशेष  दादासाहेब गवई यांच्या १० व्या पुण्यस्मरण दिनी देशाचे सर न्यायाधीश माननीय भुषणजी रामकृष्ण  गवई यांच्या हस्ते दारापुर येथे  माजी राज्यपाल स्मृतीशेष  रा.सु. उपाख्य दादासाहेब गवई स्मृती प्रवेशद्वार चे भूमिपूजन करण्यात आले. 
सर्वप्रथम देशाचे सर न्यायाधीश माननीय भूषणजी रामकृष्ण गवई यांचे दारापूर येथे आगमन होताच आ.सौ. सुलभाताई खोडके व आ.संजय खोडके यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर सरन्यायाधीश भूषणजी गवई यांनी कुदळ मारीत व नामफलकाचे अनावरण करून भूमीपूजनाची औपचारिकता साधली. 
दिवंगत नेता रा.सु. उपाख्य दादासाहेब गवई हे देशाच्या राजकारणातील सर्वसमावेशक नेतृत्व होते, त्यांनी सामाजिक न्यायासाठी दीर्घकाळ लढा दिला. विधानपरिषदेचे आमदार, उपसभापती, खासदार व राज्यपाल अशा विविध पदांवर कार्यरत राहून त्यांनी सामाजिक परिवर्तनाचे कार्य केले.त्यांचे जीवनकार्य आणि मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या स्मृतीचे जतन होणे महत्वाचे आहे. त्यामुळे दारापुर येथे साकारण्यात येणारे स्मृती प्रवेशद्वार हे दादासाहेबांच्या प्रदीर्घ व झंझावाती कारकिर्दीची साक्ष देणारे एक दिपस्तंभ ठरणार असल्याचे सांगून आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी त्यांच्या पुण्यतिथी निमित्य आदरांजली  अर्पण केली. तसेच आ.संजय खोडके यांनी  स्मृतिशेष दादासाहेब गवई यांची संसदीय कारकीर्द उल्लेखनीय असून त्यांचे सर्व पक्षीय नेत्याशी मधुर संबंध असल्याने ते खऱ्या अर्थाने राजकारणातील अजातशत्रू होते. अशा शब्दात दादासाहेब गवई यांच्या  स्मृतींना उजाळा दिला. यावेळी रिपाई नेता डॉ. राजेंद्र गवई, ट्रस्टच्या अध्यक्ष सौ.कीर्तीताई अर्जुन (गवई ),ट्रस्टचे सचिव प्रा.डॉ.कमलाकर पायस, प्राचार्य डॉ. डी.टी. इंगोले यांचेसह मान्यवर तसेच दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी व सहकारी व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.