फळबाग लागवड व जलतारा शोषखड्डे कामांची तपासणी कापुसतळणी येथे विभागीय अधिकाऱ्यांचा दौरा

फळबाग लागवड व जलतारा शोषखड्डे कामांची तपासणी कापुसतळणी येथे विभागीय अधिकाऱ्यांचा दौरा
नांदगाव पेठ / प्रतिनिधी


     अमरावती तालुक्यातील कापुसतळणी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत चालू असलेल्या फळबाग लागवड  व जलतारा शोषखड्यांच्या कामांची सखोल पाहणी करण्यात आली.
या तपासणी दौऱ्यात विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथील अधीक्षक तथा कृषि अधिकारी (रोहयो) निलेश ठोंबरे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष हजेरी लावून कामांचे निरीक्षण केले.
        तपासणी दरम्यान कापुसतळणी येथील सहाय्यक कृषी अधिकारी मीना जाधव यांनी फळबाग लागवड आणि जलतारा शोषखड्ड्यांचे सविस्तर स्पष्टीकरण दिले. संत्रा फळबाग लागवड लाभार्थी संजय धोटे व  भानुदास खेडकर यांनी मिळालेल्या लाभाबाबत आपले अनुभव सांगितले.
कापुसतळणी येथे एकूण 80 जलतारा शोषखड्ड्यांची कामे पूर्ण झाली असून यामुळे विहिरीतील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या वाढल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. तपासणी अधिकाऱ्यांनी या कामांची गुणवत्ता पाहून समाधान व्यक्त करत अशाच प्रकारे उत्कृष्ट कामे पुढेही करावीत असे प्रोत्साहन दिले.
    तसेच, त्यांनी जलसंधारणाच्या दृष्टीने जलतारा शोषखड्डे ही काळाची गरज असून फळबाग लागवडीबरोबरच या कामांना देखील महत्त्व द्यावे, असेही स्पष्ट केले. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या मार्फत मनरेगा योजनेतून होत असलेली कामे ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व जलसंपत्ती वाढवणारी ठरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी 
 कापूसतळणी येथील सरपंच मनीषा पोहकार, मंडळ कृषी अधिकारी नीता कवाने, ग्रामपंचायत अधिकारी इंगळे, उपकृषी अधिकारी कु. शुभांगी बोंडे, एपीओ भूषण देशमुख व  पंकज देशमुख, श्रीकांत ईश्वरेकर, रोजगार सेवक किशोर उके तसेच संबंधित लाभार्थी देखील उपस्थित होते.