सुखाची झोप स्मशान भुमित पण येते .........
"आयुष्यभर सुखाची झोप मिळावी म्हणून धावत राहतो. पण सुखाची झोप घ्यायला जागा तरी किती लागते हो 2/6 एवढीच पण त्यासाठीच किती आणि केवढा तो दुनियादारीचा अट्टाहास सुरु असतो पण खरंतर तिथेच खरी सुखाची झोप लागते. कारण संपूर्ण विचारचक्र थांबलेलं असतं.कोण सोबत आलंय कोण नाही याची अजिबात चिंता नसते. कोण आपलं कोण परकं याच्याशी सोयरसुतक नसतं.ना कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप ना प्रायश्चित करण्याच गिल्ट.ना कुठलं टेंशन ना कुठला मानसिक आर्थिक शारीरिक ताण तणाव. बसं सुखात चिरनिद्रिस्थ असतो माणूस....
कारण तो एक हक्काचा विसावा असतो खरंतर सुखद असतो तो.
कारण किती रडगाणं असतं वास्तविक आयुष्यात. हा असं बोलला,तो तसं वागला. ह्याने साथ सोडली तो चुकला कधीतरी आपणही चुकलेलो असतो किंबहुना बऱ्याचदा आपणच चुकलोय त्यामुळे केवढं तें मनावर ओझं. कितीतरी जबाबदाऱ्या पेलवताना केलेली तारेवरची कसरत. कितीतरी वेळा इतरांच्या स्वप्नासाठी मारलेली आपली स्वप्न मन ह्या सगळ्यात कितीतरी रात्री जागून काढलेल्या. शरीराने मनाने थकलेलो असूनही उडालेली झोप कधीच सुखात झोपू देतं नसते.खरंतर जोपर्यंत श्वास आणि हृदयची धडधड थांबतं नाही तोपर्यंत आपण सुखात झोपतच नाही. सतत काहीतरी असतंच डोक्यात आणि त्या विचारचक्रातून कोणाला सुटका आहे जी आपल्याला मिळेल.
खूप जण म्हणतात अपेक्षा हे दुःखाच मूळ आहे त्यामुळे कोणाकडून कसलीही अपेक्षा ठेवुनच नये. पण प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळावं एवढी शुल्लक अपेक्षा सुद्धा न ठेवावी म्हणजे आपण एवढे ध्यानस्थ प्रगल्भ असतो का?
आयुष्यात कितीतरी वेळा अनेकदा एकटं वाटतं तेव्हा आपल्याला मनापासून वाटतं असतं कीं कोणीतरी सोबत असावं, आपल्याला आपण जसे आहोत तसंच आपल्या गुणदोषासहित स्वीकारावं.आपल्यावर प्रेम करावं आपली काळजी घ्यावी आपल्यावर हक्क गजवावा आणि त्याच्याशी खुप खूप भरभरून मनमोकळे बोलाव.आपण त्याला घट्ट मिठी मारून मनसोक्त रडावं. त्याच्या ऊबदार मायेच्या स्पर्शात सगळं जग विसरून जावं.पण अश्यावेळी अनेकदा आपण एकटेच असतो. आणि जेव्हा श्वास विचार धडधड सगळी दुनियादारी सुटते तेव्हा आपण अगदी सगळ्याच्या पलीकडे जाऊन निपचित पडलेलो असतो ना तेव्हा मात्र आपल्या आसपास खुप गर्दी जमते आपल्या चूक बरोबरीचा हिशोब मांडला जातो.तेव्हा शेवटचा निरोप द्यायला आलेले सर्वच आपल्याला हलवून हलवून म्हणतं असतात बोल ना बोलतं का नाही. अरे जेव्हा बोलायचं होतं तेव्हा तुम्हाला ऐकायला वेळ नव्हता आता मला असंच शांत गाढ झोपायचं आहे अगदी कायमच तेव्हा तुम्ही म्हणताय कीं बोल म्हणून. मला मनातून ओढ होती गरज होती तेव्हा तुम्ही मिठीत घेऊन मला धीर दिला नाही. तुमच्या मायेच्या स्पर्शाची ऊब दिली नाही आणि आता माझं शरीरहीं थंड पडलंय तेव्हा तुम्ही मला मिठीत घेऊन रडताय केवढा हा विरोधाभास ना.
माणूस जातो तेव्हा ना त्याचा आवाज परत ऐकायला मिळतो ना त्याचा स्पर्श सहवास अनुभवता येतो. पण तो गेल्यावर त्या सगळ्यांची तीव्र कमी भासते.
असो सगळ्याचा हक्काचा विसावा म्हणजे 6/2 ची जागा आणि तीच सुखाची झोप घ्यायची जागा. तिथून तुम्हाला कधीच कोणीच उठवणार नसतं आणि उठवलं तरी तुम्ही उठणार नसतात येवढ मात्र खरंय....
बसं इथपर्यंत साथ देतील असेच सोबती असावेत आणि आपण जेव्हा नसू ना तेव्हा त्यांना आपलं नसणं प्रकर्षाने जाणवेल असेच जिवलग असावेत.बाकी सगळी मोहमाया आहे. मृगजळ ज्यामागे कितीही धावल तरीही ओंजळ रिकामीच राहणार असते. त्यामुळे मित्रांनो आपल्या जिवलग सोबत आहेत तोपर्यंत भरभरून बोलून घ्या, प्रेमाने त्यांना मिठी मारून त्यांचा प्रेमळ ऊबदार स्पर्श अनुभवा एकदा त्यांचे श्वास थांबले ना मग सगळं कालबाह्य होतं आणि आठवणीचे मोर आपल्या मनाच्या आसपास पिंगा घालू लागतात पण मित्रांनो आठवणी कधीच सहवास देतं नाहीत त्या फक्त आणि फक्त आभास देतं आणि आपल्या जिवलगांचे भास खुप वेदनादायी असतात म्हणून सोबत आहेत तोपर्यंत च्या आठवणी सुद्धा इतक्या सुंदर बनवायच्या असतात कीं त्याला सुखात झोपलेलं बघून आपल्याला देखील समाधान मिळावं बसं एवढंच करायच जास्त काय करायची गरजच नाही मग ...
🖋️🖋️Prasad mote