महिला वाहन चालक सौ. सुजाता सोनटक्केचा जिवनप्रवास

महिला वाहन चालक सौ. सुजाता  सोनटक्केचा जिवनप्रवास 
सौ. सुजाता ज्ञानदेव सोनटक्के , वय वर्षे ४३, व्यवसाय :- स्कुल व्हॅन चालक. हि दुर्गा सातारकर नागरिकांना माहित नाही असे नाही. पतीचा खाजगी व्यवसाय , त्यातून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न आणि त्यामुळे संसार चालवताना होणारी ओढाताण, मग एका शाळेच्या स्कुलबसवर अटेंडंट म्हणून नोकरी आणि उरलेल्या वेळेत पतींच्या इस्त्रीच्या दुकानात काम . हि अटेंडंटची नोकरी करतानाच आजच्या त्यांच्या ह्या व्यवसायाची बीजे मनात रोवली गेली.

खरेतर घरातील परिस्थितीचा विचार करता आम्हाला फोरव्हीलर गाडी घेऊ असे स्वप्नात देखील वाटले नव्हते, फोरव्हीलर गाडीचा दरवाजा कसा उघडायचा हे देखील आम्हास माहित नव्हते पण निव्वळ हिच्या इच्छाशक्तीमुळे आज आमच्या दारात स्कुल व्हॅन च्या रूपाने का होईना पण फोर व्हीलर उभी आहे, असे सोनटक्के साहेब म्हणाले.

पतीच्या नकळत चारचाकी गाडी शिकायचा क्लास लावला आणि गाडी चालवायचा परवाना मिळाल्यावरच पतींना त्याबाबत सांगितले. सुरुवातीला त्यांचा काळजीमुळे गाडी चालवायला विरोध होता, कारण चुकून एखादा अपघात झालाच तर काय करा असा त्यांचा काळजीचा सूर होता . पण गाडी घेल्यावर ते देखील क्लास लावून गाडी चालवायला शिकले आणि आता आम्ही दोघेही गाडी चालवतो. गाडी आणल्यावर सुरुवातील दिवाळीत घड्याळ लावून रस्त्याने रूट फिरले कारण शाळेत मुले सोडायची वेळ पाळावी लागते. त्यावर्षी तर दिवाळीत आम्ही फराळाचे देखील काही केले नाही कारण गाडी वेळेत सगळीकडे फिरवायची प्रॅक्टिस मी करत होते. पहिल्याच दिवशी पोदार शाळेजवळ गाडीला खाली पाट्याला दगड लागला , इतर रिक्षाचालक आणि व्हॅन चालक हसले, मला रडूच आले, पण मग जिद्द धरली कि असे अनेक प्रसंग येतील पण रडून चालणार नाही. तेव्हा मला हसणाऱ्या त्या इतर पुरुष रिक्षाचालकांशी देखील मी वाद घातला नाही. आज आता मला धंद्यात सगळे मदत करतात. पोलीस देखील मला मदत करतात. सकाळच्या तनिष्काची मी सभासद आहे . तनिष्काच्या एका कार्यक्रमात मला तेव्हाचे एसपी संदीप पाटील ह्यांनी खूप कौतुक केले आणि शाबासकीची थाप दिलेली होती.

ह्या सगळ्यात घराचे धुणे भांडी करून बाहेर पडावे लागते. कुठल्याही परिस्थितीत वेळ लावून चालत नाही. इथे थोडाही उशीर चालत नाही कारण माझ्याकडे चार शाळेतील मुले आहेत . त्यांना उशीर झाला तर शाळा त्यांना गेटवर उभे करणार, त्यांचे पालक ओरडणार त्यामुळे मी पहिल्यापासून वेळ पाळण्याकडे कटाक्ष ठेवला आहे. शाळेतील स्टाफ, इतर रिक्षाचालक, स्कुल व्हॅन चालक, मुलांचे पालक ह्यांचे खूप सहकार्य मिळते . चार वर्षे झाली हि व्हॅन घेऊन. तिच्या कर्जाचे हफ्ते चालू आहेत. मुलीला एमबीए केली आणि तिचे लग्न करून दिले. मुलगा बीएस्सी लास्ट वर्षाला आहे, त्याला एमएस्सी करायचे आहे. मुलांचे शिक्षण हि आमच्या आयुष्यातील प्राधान्याची गोष्ट असल्याने अजून घर करू शकलो नाहीये, पण त्याचे वाईट वाटत नाही. भाड्याच्या घरात राहत असलो तरी घरमालक खूप सहकार्य करतात. मला स्कुल व्हॅन चालवताना पाहून सुरुवातीला लोकांना खूप आश्चर्य वाटायचे, लोक फोटो काढायचे . अगदी मागच्या आठवड्यातील घटना सांगते, मी गाडी चालवत होते आणि समोर एका गाडीतील बायका माझे स्कुल व्हॅन चालवतानाचे शूटिंग करत होत्या , जाताना मला हात हलवून गेल्या. खूप भारी वाटते अशावेळी. सुरुवातीला सगळ्यांना शंका असायची आणि भीती वाटायची कि हिला गाडी चालवायला जमेल का , पण आता सगळे माझे कौतुक करतात. नंतर मी स्कोडा, मर्सिडीझ , जीप अशा गाड्यादेखील चालवून पहिल्या आहेत. सध्या गाडीचे कर्ज फेडायचे ह्याला जास्त प्राधान्य देतोय आम्ही.सासर महेर सगळीकडच्या लोकांनी मला मदतच केलीय त्यामुळेच मी आज रस्त्यांवर गाडी चालवू शकते. कधीकधी ट्राफिक जॅम होते, मग मुलांना शाळेत जायला उशीर होईल ह्याची भीती वाटते. पण सुदैवाने अजून तशी वेळ आली नाही कारण काहीही करून प्रत्येक मुलाच्या घरापर्यंत कधी पोचायचे ह्याचे माझे वेळापत्रक मी पक्के केलेले आहे. अनेक लोकांनी मुलाखती घेतल्या , पेपर मधून फोटो आणि लेख छापून आले , माझी प्रसिद्धी झाली, मग काही स्त्री संघटनांनी पुरस्कार दिले , पण मला खरा पुरस्कार कधी मिळाला सांगू का, एक दिवस एक रिक्षावाले काका माझ्यापाशी आले, म्हणाले , पोरी, माझी गाडी मी एकाला चालवायला दिली होती आणि मी निवांत राहत होतो, पण तुला गाडी चालवताना पहिले आणि मनाशी पक्के ठरवले कि एक बाई जर घर चालवणायसाठी गाडी चालवत असेल तर मी असा निवांत फिरणे चुकीचे आहे, मग त्यांनी त्यांची रिक्षा स्वतः चालवायला सुरुवात केली. ................. सुजाता ताई सांगत होत्या आणि एक जन त्यांचे कष्ट कागदावर टिपून घेत होतो.

स्त्रीचे आयुष्य म्हणजे कष्ट , पण जर कष्टाला जिद्दीची जोड मिळाली तर काय घडू शकते त्याचे मूर्तिमंत उदाहरण माझ्या डोळ्यासमोर सुजाता सोनटक्के ह्यांच्या रूपात उभे होते. समोर उभ्या ठाकलेल्या प्रत्येक संकटावर मात करणारी ही दुर्गाच जणू.